नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधील एकेक सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वस्त मंडळातील रिक्त जागेवर जनस्थान पुरस्कारासाठी २०२४-२५ वर्षात दोन लाखाची देणगी देणाऱ्या आणि पुढील दोन जनस्थान पुरस्कारांचेही प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव निश्चित झाले असून नाव जाहीर होण्याची औपचारिकता तेवढी बाकी आहे. संबंधिताकडून संमती घेतली नसल्याने विश्वस्त मंडळाने नाव जाहीर केलेले नाही. या घटनाक्रमातून देणगीरुपात सुमारे सहा लाख देणाऱ्या व्यक्तीला थेट प्रतिष्ठानचे विश्वस्त होता येते, असा संदेश जाणार असल्याने काही सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यवाह सुरेश भटेवरा यांच्या राजीनाम्यामुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळातील सदस्य संख्या १० वर आली आहे. घटनेनुसार विश्वस्त मंडळात किमान ११ सदस्य असणे बंधनकारक आहे. विश्वस्त मंडळात सध्या एकूण पाच पद रिक्त आहेत. परंतु, घटनेतील निकष पूर्ण करण्यासाठी तूर्तास एकाच सदस्याची नियुक्ती केली जाईल. कारण, सदस्यांचा निकष पूर्ण नसल्याने कारभारात काही अडचणी येऊ शकतात. अलीकडेच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत भटेवरा यांचा राजीनामा मंजूर करताना रिक्त झालेल्या पदावर नाव निश्चिती करण्यात आली होती. संबंधित व्यक्ती परदेशात असल्याने अद्याप त्यांची संमती बाकी आहे. विश्वस्त मंडळाची २० नोव्हेंबरनंतर बैठक होऊन या रिक्त पदावर नियुक्ती होईल, असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडून आधीच सांगण्यात आले आहे.

तीन नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीवरून माजी कार्यवाह सुरेश भटेवरा आणि एक सल्लागार व विश्वस्त यांच्यात मतभेद झाले होते. ज्यांची नावे सुचविली गेली, ती साहित्य व नाट्य क्षेत्रातील दिग्गज व स्थानिक मंडळी होती. पारदर्शकपणे ही प्रक्रिया पुढे गेल्यानंतर अविश्वास दाखविला गेल्याने भटेवरा हे प्रतिष्ठानमधून बाहेर पडले. आता विश्वस्त ज्यांची नियुक्ती करणार आहेत, ती हवाई क्षेत्रातील कंपनी चालविणारी व्यक्ती आहे. संबंधिताच्या कंपनीने २०२४-२५ या वर्षात प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजकत्व स्वीकारून दोन लाख रुपयांची देणगी दिली होती. इतकेच नव्हे तर, पुढील दोन जनस्थान पुरस्कारांचे प्रायोजकत्व त्याच कंपनीने स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून प्रतिष्ठानच्या तिजोरीत सुमारे सहा लाख रुपयांची भर पडण्याचा अंदाज आहे. सलग तीन वर्ष प्रत्येकी दोन लाखांची देणगी देण्याची तयारी दर्शविणाऱ्या व्यक्तीचे नाव विश्वस्तपदी निश्चित करताना प्रतिष्ठानने नेमका काय विचार केला, यातून कोणता संदेश जाईल, याकडे सभासद लक्ष वेधत आहेत.