धुळे : गंगापूर येथे जिओ पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखून दोघांनी बळजबरीने ऐवज लांबविला. आज पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान हा थरारक दरोडा घालण्यात आला.याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या घटनेत सुमारे २५ हजार रुपये सुमारे २५ हजार रुपये किमतीचाऐवज दरोडेखोरांनी लांबविल्याचे म्हटले जाते आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहिती नुसार साक्री तालुक्यातील गंगापूर गावाजवळ असलेला जिओ पेट्रोल पंप दिलिप नांगरे हे चालवीत आहेत.या पेट्रोल पंपावरच हा थरार घडला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वळवी या अधिकाऱ्यांसह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपुर्ण घटनाक्रम समजावून घेण्यात आला.घटनास्थळाचा पंचनामा करताना संशयित दरोडेखोरांच्या कृत्याचे पुरावे जमा करण्यात आले.

पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून संशयित दरोडेखोरांना लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात यापूर्वीही महामार्ग, राज्यमार्ग आणि निर्मनुष्य तसेच आडरस्त्यावर शस्त्र दाखवून लहान मोठ्या किंवा जबरी चोरी झाल्याचा घटना घडल्या आहेत. अनेक घटनांचा तपास पोलिसांनी अवघ्या काही तासातच लावून संशयितांना ताब्यात घेतले आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.

रात्र गस्त आणि तांत्रिक यंत्रणेचा वापर करून पोलिस सतत सराईत गुन्हेगारांच्या मागावर असल्याचा दावा अनेकदा केला जातो. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ऑल आउट किंवा हिष्ट्रीशीटर चेकिंग यांसारख्या प्रभावी योजना राबवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आहे.असे असताना गुन्हेगार बंदुकी सारखे शस्रे दाखवून लूट करत आहेत. यामुळे पोलीस जेवढे प्रभावी उपाय शोधतात त्यापेक्षा गुन्हेगार अधिक पुढची संकल्पना अमलात आणून तपास यंत्रणेला जणू आव्हान देऊ लागले आहेत.प्रामुख्याने साक्री तालुक्यात असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प आणि पवन चक्की प्रकल्प आदी ठिकाणीही वर्षभरात अनेक ठिकाणी लहान मोठ्या चोऱ्यांची मालिका सुरूच राहिली आहे.