नाशिक : शहर परिसराला वाहतूक तसेच अवजड वाहनांचा विळखा नवा नाही. मात्र यामुळे होणारी वाहतूक कोंडी जिवावर बेतु लागली आहे. नाशिकरोड येथील मुक्तीधाम परिसर कायमच वाहतूक कोंडीत असतो. वाहने आणि माणसांनी गजबजलेल्या या ठिकाणी सायंकाळी वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मंगळवारी सायंकाळी रस्ता ओलांडत असताना एका महिलेला मालवाहतूक वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेबरोबर असलेल्या २७ वर्षीय गरोदर महिलेचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. तिचे बाळही या अपघातामुळे दगावले. अपघातांना आमंत्रण देणाऱ्या अवजड वाहतूकीवर नियंत्रण कसे आणणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकरोड येथील मुक्तीधाम मंदिरासमोरील रस्ता नेहमीच अतिक्रमण व वाहतुक कोंडीमुळे धोकादायक ठरतो. नांदुर नाका परिसरासह अन्य भागातून भरधाव येणाऱ्या अवजड वाहनांमुळे नागरीकांना जीव मुठीत धरुन ये- जा करावी लागते. मंगळवारी सुनीता वाघमारे (५०) या त्यांची मुलगी शीतल केदारे (२७, रा. मखमलाबाद, पंचवटी) हिला बरोबर घेऊन कामानिमित्त बाहेर पडल्या होत्या. सायंकाळी दोघी मायलेकी नाशिकरोड मुक्तीधाम परिसरातील वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या. त्यावेळी रस्ता ओलांडत असतांना बिटकोहून मालधक्का रस्त्याकडे जाणारे मालवाहतूक वाहन भरधाव येत होते.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू वाहनाची प्रथम एका मोटारीला धडक बसली. त्यानंतर बाजूला उभ्या दोन रिक्षांना ती धडकली. यानंतर मालवाहू वाहनाने दोन्ही मायलेकींनाही धडक दिली. परिसरातील नागरीकांनी जखमींना तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात सुनीता वाघमारे यांचा मृत्यू झाला. तर मुलगी शीतल हिच्या पोटातील बाळ अपघातात दगावले. जखमी शीतलचा बुधवारी मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असतांना अतिक्रमण व वाहतुकीच्या गोंधळाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील काही अपघातग्रस्त ठिकाणे
नाशिक शहर परिसरातील अपघातप्रवण क्षेत्राची यादी सातत्याने अद्यावत होत राहते. यामध्ये संभाजीनगर महामार्गावर हॉटेल मिरची लगत असलेला चौक, द्वारका सर्कल, कॉलेज रोड, पंचवटी परिसरातील तारवाला नगर, क. का. वाघ महाविद्यालयसमोरील चौक, बळी महाराज चौक यासह काही ठिकाणे आहेत. यामध्ये प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वाहतुक सिग्नल यंत्रणा, स्पीड ब्रेकर, वाहतुक पोलीसांची नेमणुक आदी व्यवस्था करण्यात येत आहे.
मुक्तीधाम परिसर रहदारीचा आहे. या ठिकाणी हॉटेल तसेच काही दुकाने आहेत. त्या ठिकाणी आलेले लोक हे वाहने रस्त्यावर लावतात. त्यामुळे रस्ता अजुन कमी होऊन जातो. अपघाताच्या वेळी मालवाहतुक वाहन येत असतांना रिक्षा दुभाजकाच्या बाजुने मध्ये घुसली. त्या रिक्षेला वाचवत असतांना वाहनचालकाने गाडी बाजुला घेतली मात्र त्याच वेळी या दोन्ही महिला रस्ता आेलांडत असतांना त्यांना धडक बसली. वाहनचालक वाहनासह नाशिकरोड पोलीसांच्या ताब्यात आहे. या सर्व प्रकारात अतिक्रमण महत्वाचा मुद्दा असून या विषयी महापालिकेशी तसेच संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.- जितेंद्र सपकाळे (पोलीस निरीक्षक, नाशिकरोड)