जळगाव : जिल्ह्यात दिवाळीनंतरच्या पावसामुळे वेचणी राहून गेलेल्या कापसाचे तसेच काढणीवर आलेल्या मक्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा पाऊस सध्या फुलोरा आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या शिवारातील तूर पिकासाठी फायद्याचा ठरेल की तोट्याचा, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
तूर पिकासाठी फुलोरावस्था अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या अवस्थेत पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी आणि पोषणद्रव्यांची आवश्यकता असते. पाऊस किंवा विहिरींचे पाणी मिळाले नाही, तर फुलगळ होऊन तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वाढते. सुदैवाने सप्टेंबरमधील पावसाने या वर्षी जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला होता. मात्र, ऑक्टोबरमधील तापमान वाढीमुळे तुरीचे पीक ऊन धरू लागले होते. त्यामुळे दिवाळीनंतर झालेला परतीचा पाऊस तूर पिकासाठी वरदान ठरला आहे. या पावसामुळे जमिनीतील ओलावा पुन्हा वाढल्याने तूर पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. फुलोऱ्यानंतर तुरीच्या शेंगा भरू लागल्या आहेत. परिणामी, जेथे आधी उत्पादन घटण्याची भीती होती तिथे आता उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात तूर शक्यतो आंतरपिक म्हणून घेतले जाते. सोयाबीन, उडीद या पिकांमध्ये तुरीची पेरणी केली जाते. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असते, त्यामुळे तुरीला चार महिने पाणी देण्याची गरज भासत नाही. पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची कमतरता भासल्यास सिंचनाची सोय करावी लागते. साधारणपणे फुलोरा व शेंगा भरण्याच्या दरम्यान पाणी दिले तर तुरीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. कृषी तज्ज्ञांच्या मते, यंदा परतीचा पाऊस योग्य वेळी झाल्यामुळे तूर पिकाची फुलगळ कमी होईल. शेंगांमधील दाणे भरदार तयार होतील. उत्पादनातही अंदाजे १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकेल.
जळगाव जिल्ह्यातील तूर लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार हेक्टरपर्यंत आहे. प्रत्यक्षात, शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात तुरीवर भर दिल्याने लागवडीखालील क्षेत्र सुमारे २० हजार हेक्टरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांमध्ये सर्वात उशिरा तुरीच्या शेंगा येतात. त्यामुळे या पिकाला परतीच्या पावसाचा जास्त फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणार्या काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा सुमारे २० हजार हेक्टरपर्यंत तूर पिकाची लागवड झाली आहे. सध्या फुलोरा आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तुरीला दिवाळीनंतरचा पाऊस लाभदायक ठरेल. उत्पादनातही १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत. -कुर्बान तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव)
