मालेगाव : विधवा आई,पाच भावंडांचे कुटुंब व घरात अठरा विश्व दारिद्र्य अशी एकीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती अन् दुसरीकडे एमपीएससीतर्फे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) विविध पदांसाठी वेळोवेळी घेतल्या गेलेल्या मुख्य परीक्षांमध्ये तब्बल १६ वेळा पदरी आलेले अपयश. मात्र, हार न मानता परिश्रम,जिद्द व चिकाटीच्या जोरावर ‘एमपीएससी’च्या राज्यसेवा परीक्षेत अखेर यशाला गवसणी घातली. मालेगावची माहेरवाशीण व कोपरगाव येथे झाडू कामगार असलेल्या महिलेच्या लेकीची ही यशोगाथा आहे. उषा गंगाधर पवार या जिद्दी मुलीचा हा संघर्षमय प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.

गुरुवारी रात्री राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागल्यावर यशाची ही सुखद वार्ता येऊन धडकल्यावर पवार कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या कोपरगावच्या सुभाष नगरमधील लहानशा झोपडीवजा पत्र्याच्या घरातील माहौल अचानक बदलून गेला. गेली कैक वर्षे केवळ संघर्ष व दुःखच वाट्याला आलेल्या या कुटुंबात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी स्थिती या यशामुळे निर्माण झाली. या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी मग लोकांची रीघ लागली. मालेगाव तालुक्यातील सातमाने गावचे शेतकरी पंढरीनाथ सुखदेव काथेपुरी यांच्या बहिणीची उषा ही मुलगी आहे. उषाची आई अहिल्याबाई या कोपरगाव नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने झाडू कामगार म्हणून काम करतात.

सोळा वर्षांपूर्वी उषाच्या वडिलांचे निधन झाले. तत्पूर्वी नऊ वर्षे ते अर्धांगवायुच्या आजारामुळे अंथरुणाला खिळलेले होते. एक मोठा भाऊ व चार बहिणी अशा पाच भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यामुळे अहिल्याबाईंवर पडली. त्यामुळे नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने झाडू कामगार म्हणून काम त्यांनी स्वीकारले. त्यातून मिळणारी अल्प कमाई ही या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन. दरम्यान, उषाच्या तिन्ही मोठ्या बहिणींची लग्ने झाली. उषाचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर याने कोपरगावातच बूट पॉलिशचे काम करुन आईच्या संसारात आर्थिक हातभार लावला. अशा या गरीब मागासवर्गीय कुटुंबातील भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या उषाने मात्र लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. एमपीएससी परीक्षेतील यशाचा आपला सूर्य एकदिवस नक्की उगवणार,हा दृढ विश्वास तिच्या ठायी ठासून भरलेला होता. त्यानुसार अथक प्रयत्नानंतर यशाला गवसणी घातली, तेव्हा तिच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला.

उषा हिचे सातवीपर्यंतचे शिक्षण कोपरगावच्या नगरपालिका शाळेत झाले. कोपरगाव मध्येच इंग्लिश विषयात कला शाखेची पदवी तिने मिळवली. त्यानंतर नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण तिने पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती पुणे येथे गेली. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक, कर निरीक्षक, गट ब व गट क अशा वेगवेगळ्या पदांसाठीच्या परीक्षा ती देत राहिली. गेल्या दहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठीच्या १६ पूर्व परीक्षांमध्ये ती ओळीने उत्तीर्ण झाली, परंतु प्रत्येक वेळी मुख्य परीक्षेतील यशाने तिला हुलकावणी दिली. तरीदेखील ती निराश झाली नाही. पुढे खर्च झेपेनासा न झाल्याने तिला पुणे सोडावे लागले. गावाजवळील संगमनेर येथे मैत्रिणींसोबत रुम घेऊन तेथील लायब्ररी अभ्यासासाठी तिने जॉईन केली. त्यासाठी दिवसाचे बारा ते सोळा तास अभ्यासात स्वतःला तिने झोकून दिले. या सर्व परिश्रमांचे चीज झाले आणि सुदैवाने यावर्षीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत पहिल्यांदाच ती उत्तीर्ण झाली. महत्वाचे म्हणजे मुख्य परीक्षेतील या यशामुळे आत्मविश्वास उंचावल्याने मुलाखतही चांगली झाली. परिणामी अंतिम निकालात तिने बाजी मारली. या निकालात अनुसुचित जाती संवर्गात १४ वी रॅंक मिळाल्याने तिला वर्ग-१ पद मिळण्याची शक्यता आहे.

उषाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे व नाशिक येथे राहण्याचा खर्च या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता. मात्र अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून झाडू कामगार असलेली आई व बूट पॉलिश करणाऱ्या भावाने पोटाला चिमटा काढून आणि प्रचंड हाल-अपेष्टा सहन करत तिला शक्य तेवढे पैसे पुरवले. कौटुंबिक परिस्थितीची जाण असल्याने स्वतःचा खर्च भागवण्यासाठी संगमनेरमध्ये असताना उषाने अभ्यास करता करता मेसमध्ये चपात्या लाटण्याचे आणि भांडी घासण्याचे पार्टटाइम काम देखील पत्करले. अधिकारी होण्याची उषाची संघर्षकथा समाजासाठी खरोखर प्रेरणादायी आहे.