मालेगाव : ‘संकटमोचक’ अशी प्रतिमा निर्माण झालेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून बनवण्यात आलेल्या व्हिडिओची एक क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. जळगाव जिल्ह्यातील महाजन यांच्या नाशिकच्या राजकारणात वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल आक्षेप घेणारा सूर या व्हिडिओ क्लिपमध्ये लावण्यात आला आहे. नाशिकच्या विकासासाठी स्थानिक दिग्गज नेते समर्थ आहेत,तुम्ही तुमच्या जामनेर मतदार संघाचे काय ते बघा असा सल्ला या क्लिपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून मालेगावच्या हिरे घराण्याचा दबदबा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील राजकारणावर २००४ नंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मांड बसवली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील राहिल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात भुजबळ म्हणतील ती पूर्व दिशा,अशी स्थिती नाशिक जिल्ह्यात झाली होती. २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने गिरीश महाजन यांचाच शब्द प्रमाण,अशी स्थिती नाशिक जिल्ह्यात झाली.

प्रारंभी पाच वर्षे महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे छगन भुजबळ व नंतरच्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. आताच्या फडणवीस सरकारच्या काळात जिल्ह्यात सात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) माणिकराव कोकाटे यांच्यासाठी पालकमंत्री पदावर दावा ठोकला होता. दुसरीकडे जिल्ह्यात दोनच आमदार असले तरी दादा भुसे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटही पालकमंत्री पदासाठी अडून बसला होता. मात्र,ऐनवेळी महाजन यांची या पदावर नियुक्ती जाहीर केली गेली. अर्थात त्याला कडाडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री फडवणीस यांनी ही नियुक्ती रद्द केली.

सध्याच्या घडीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त असले तरी महाजन यांची देहबोली, शासकीय बैठका घेण्याचा त्यांचा धडाका व प्रशासनात असलेला त्यांचा वचक बघता महाजन हे नाशिकचे पालकमंत्रीच भासत असतात. तसेच होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मंत्री समितीच्या अध्यक्षपदी देखील त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदार संघातून निवडून आलेल्या महाजन यांचे अशाप्रकारे नाशिक जिल्ह्यात वाढलेले प्रस्थ अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असताना एकालाही मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यात आगामी निवडणुका जिंकण्याच्या नावाखाली कोणतीही पार्श्वभूमी न तपासता तसेच पक्षातील आमदार व ज्येष्ठांना डावलून कुणालाही भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी महाजन हे उतावीळ झाल्याची प्रचिती वारंवार येत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आता भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यामुळे आयाराम-गयारामांना पावन करून घेण्याचा महाजन यांच्या भूमिकेबद्दल पक्षांतर्गत खदखद वाढत असल्याचे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाजन यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. हिंदी भाषेतील ही व्हिडिओ क्लिप कोणी बनवली याचा उलगडा मात्र होत नाही. मालेगावच्या हिरे कुटुंबीयांच्या शैक्षणिक व सहकारी संस्थांच्या विरोधात सध्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. माजी आमदार अपूर्व हिरे हे अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून (अजित पवार) भाजपमध्ये दाखल झाले आहेत. हिरे कुटुंबीयांना चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचविण्यासाठी महाजन हे प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्यात त्यांनी ढवळाढवळ करू नये,असे या क्लिपमध्ये सुचिविण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक मातब्बर नेते समर्थ आहेत. त्यासाठी महाजन यांची गरज नाही. त्यांनी त्यांच्या जामनेर मतदार संघात लक्ष घालावे, असा सल्ला या क्लिपच्या माध्यमातून देण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात ही क्लिप सध्या चर्चेचा विषय बनली आहे.