निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदानानंतर गुरुवारी मतमोजणी झाली आणि पुढील पाच वर्षांसाठी नाशिककरांनी जिल्ह्य़ाच्या कारभाऱ्यांची निवड केली. जिल्ह्य़ात लोकसभेच्या एकूण १५ जागा होत्या. यापैकी सहा जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली तर त्या खालोखाल पाच जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
शिवसेनेला दोन जागा मिळाल्या तर कॉंग्रेस आणि एमआयएम यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. पुढील पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या आमदारांची ओळख..
प्रा. देवयानी फरांदे (नाशिक मध्य, भाजप)
विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांची स्नुषा प्रा. देवयानी फरांदे या ३५ वर्षांहून अधिक काळापासून भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. विधानसभेत सलग दुसऱ्यांदा प्रा. फरांदे विजयी झाल्या. सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रभावीपणे काम करण्याच्या शैलीमुळे नाशिक महापालिकेत त्या सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. या कालावधीत त्यांनी उपमहापौरपदाची धुरा नेटाने सांभाळली. शालेय जीवनात विविध स्पर्धामध्ये पारितोषिक पटकाविणाऱ्या प्रा. फरांदे यांनी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्षपद सांभाळले. आदर्श विद्याथ्र्ििनी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. के.टी.एच.एम. महाविद्यालयात बी.एस्सी, पुणे विद्यापीठातून एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) शिक्षण घेतल्यानंतर त्या मविप्रच्या बी. फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात काम सुरू असतांना त्या पती सुहास फरांदे यांच्या सोबतीने राजकारणात सक्रिय झाल्या. १९९७ साली प्रथमच नगरसेवकपदाची निवडणूक लढविली आणि नगरसेविका झाल्या. तेव्हापासून त्यांनी राजकारणात कधी मागे वळून पाहिलेले नाही. २०१२ मध्ये मनसेचे वारे असतांनाही प्रा. फरांदे यांनी मताधिक्याने विजय मिळवला. उपमहापौरपदी काम करतांना त्यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वाढ, घनकचरा व्यवस्थापन, गोदा प्रदुषणासह अन्य काही महत्वपूर्ण विषयांवर काम केले. त्यांचा कामाचा आवाका लक्षात घेता भाजपने त्यांच्यावर प्रदेश महिला मोर्चाच्या जबाबदारीसह चिटणीसपद दिले. नऊ वर्ष त्यांनी ही जबाबदारी लिलया पार पाडत महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. वुमेन्स फोरम आणि दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्थेची स्थापना करत प्रा. फरांदे यांनी महिलांना एक नवे व्यासपीठ खुले करून दिले आहे.
सीमा हिरे (नाशिक पश्चिम, भाजप)
राजकारणात राहूनही संयम बाळगणाऱ्या सीमा हिरे या मितभाषी म्हणून सर्वपरिचित आहेत. नाशिक पश्चिम मतदार संघातून त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. कौटुंबिक पाश्र्वभूमी राजकीय असलेल्या हिरे या उच्चशिक्षीत आहेत. वाणिज्य पदवीधर असलेल्या हिरे सलग तीन वेळा नगरसेवक, भाजपचे प्रदेश चिटणीस, समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा, इंडिपेडन्स बँकेच्या उपाध्यक्ष, ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य आहेत. राज्यात भाजपच्या बांधणीत ज्या नेत्यांचा सहभाग होता त्यापैकी एक असलेले ज्येष्ठ नेते दिवंगत पोपटराव हिरे यांची सून आणि स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी मार्फत राज्यात समर्थाच्या जीवनचरित्रावर व्याख्यान देणारे डॉ. यशवंत पाटील यांची कन्या सीमा हिरे. महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले. वैविध्यपूर्ण विकास कामांची दखल घेऊन नाशिक सिटीझन फोरमने त्यांना आदर्श नगरसेविका पुरस्काराने सन्मानित केले आहे. भाजपने सलग दोन वेळा पक्षाच्या प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पक्षाच्या माध्यमातून केली जाणारी आंदोलने, सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, मोर्चे यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. संघ परिवाराच्या नियमित उपक्रमांतही त्यांचा सहभाग असतो. सीमा हिरे यांचे पती महेश हे भाजप शहर कार्यकारिणीत आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालय, वृक्षवल्ली उद्यान, समर्थ जॉगिंग ट्रक, आजी-आजोबा उद्यान, समर्थ बालोद्यान, ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र अशी अनेक नाविन्यपूर्ण कामे त्यांनी केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मेळ्याचे आयोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गेल्या १७ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आमदार असतांना सिडकोची घरे फ्री होल्ड चा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
दिलीप बोरसे (बागलाण, भाजप)
बागलाण मतदार संघातून दिलीप बोरसे विजयी झाले. राजकीय पाश्र्वभूमी नसतांना १९८९ वर्षी बोरसे यांनी पहिल्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढविली. परंतु, त्यावेळी सहा हजार मतांनी पराभव झाला. दुसऱ्या वेळी १९९५ अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांना स्वाभिमानी पक्षाचा पाठिंबा मिळाला. त्यावेळी राज्यात सर्वाधिक मताधिक्य असलेले ते दुसरे आमदार होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २००४ मध्ये पक्षाच्या वतीने त्यांचे बंधू उमाजी बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा ७०० मतांनी पराभव झाला. २००९ मध्ये भाजपकडून पुन्हा उमाजी बोरसे यांना उमेदवारी जाहीर झाली. या निवडणुकीत ते विजयी झाले. २०१४ च्या निवडणुकीत दिलीप बोरसे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ मध्ये पुन्हा एकदा पक्षाच्या वतीने दिलीप बोरसे यांना उमेदवारीची संधी मिळाली. राजकारणात बोरसे कुटूंबिय सक्रिय असले तरी शेतीवर त्यांचा अधिक भर राहिला. बोरसे कुटूंबियांची ३०० एकर शेती आहे. द्राक्ष आणि डाळिंब पिकासाठी त्यांचा नावलौकिक असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी येतात. यंदाच्या निवडणूकीत शेतकरीच शेतीचे आणि शेतकऱ्याचे प्रश्न समजू शकतात असा प्रचार झाला. याचा फायदा बोरसे यांना झाला. मोठय़ा फरकाने त्यांचा विजय झाला. दरम्यान, राजकारणात सक्रिय असणारे बोरसे कला तसेच वाणिज्य शाखेचे पदवीधर असून लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांचे मूळ गाव बागलाण तालुक्यातील लाडुद आहे. शेती क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनिय कामाची दखल घेत त्यांना
१२ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मंगलु नाईक अनुदानित आश्रमशाळा व नवसाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत. याशिवा. शासकिय योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी नेहमी सक्रिय असतांना. तालुक्यातील अनेक सामाजिक कामांसाठी त्यांनी आर्थिक मदत केली आहे. त्यांचे बंधु अशोक मुंबई येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर आहेत. उमाजी बोरसे माजी आमदार असून अन्य दोन बंधु दौलत व सयाजी हे शेती व्यवसायात आहेत.
नितीन पवार (कळवण, राष्ट्रवादी)
कळवण विधानसभा मतदार संघात १९९८ पासून राजकारणात सक्रिय आहेत. माजी आदिवासी विकास मंत्री ए. टी. पवार यांचे ते चिरंजीव आहेत. पवार यांची पत्नी जयश्री या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून सध्या त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. स्वत पवार ही सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहत आहेत. कळवण पंचायत समितीचे ते माजी सभापती आहेत. याशिवाय कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रांतिक सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक आहेत. पवार कला शाखेचे पदवीधर आहेत. राजकारणात सक्रिय असलेले पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरले आणि विजयी झाले. राजकारणासह समाजकारणात ते सक्रिय आहेत. ४५१ आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा, आदिवासी मेळावा त्यांनी आयोजित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कळवण पंचायत समिती पक्षाच्या ताब्यात ठेवण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान. कळवण तालुक्यातील ८५ टक्के ग्रामपंचायत व विविध कार्यकारी संस्था राष्ट्रवादी कडे राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आदिवासी, शेतकरी, युवक, महिला व बेरोजगार यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनस्तरावर पाठपुरावा केला. कळवण पंचायत समितीत बुधवारी जनता दरबाराच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामस्थ यांच्याशी संवाद व हितगुज करत प्रश्न, समस्या सोडविले. आदिवासी वाडय़ा वस्ती, पाडय़ांवर सभामंडप व सामाजिक सभागृह बांधण्यात आले. कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवाना वन जमिनी कायदे अंतर्गत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर व प्रशासनस्तरावर पाठपुरावा करून आदिवासी बांधवाना वन जमिनीचा हक्क मिळवून दिला.
दिलीप बनकर(निफाड, राष्ट्रवादी)
दिलीप बनकर निफाड तालुक्यातील राजकीय वर्तुळात दिलीप काका म्हणून परिचित आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हाती घेत ते राजकारण-समाजकारण-सहकार क्षेत्रात सक्रिय राहिलेत. बनकर यांचे व्यक्तिगत आयुष्य संघर्षमय आहे. १९८६ साली पिंपळगाव महाविद्यालयातील निवडणुकीत जी.एस असलेले बनकर यांनी वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर मोठे बंधू अशोक बनकर यांच्या मदतीने वाहतूक व्यवसायात त्यांनी काम करण्यास सुरूवात केली. व्यवसायात भरभराट होत असतांना १५ ऑगस्ट १९९१ मध्ये त्यांच्या घरावर दरोडा पडला. या दरोडय़ात त्यांचे वडील आणि दोन मोठे भाऊ ठार झाले. या धक्क्यातून परिवाराला सावरत त्यांनी व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केले. १९९७ मध्ये अशोकराव बनकर पतसंस्थेची स्थापना करत त्यांनी धार्मिक, सामाजिक कार्यात सहभाग घेतला. तत्कालीन आमदार मालोजीराव मोगल यांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रत्यक्षात सहभागी झाले. १९९७ मध्ये पिंपळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली आणि विजय संपादन केला. गावातील राजकारणात भास्कर बनकर यांच्याशी मतभेद असल्यामुळे ते तानाजी बनकर यांच्या सोबत गेले आणि ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवला. १९९९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभेला ११९९च्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. मात्र १२ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. २००४ मध्ये परत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर ते विजयी झाले. दरम्यान, पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक लढविली आणि बाजार समितीचे सभापती झाले. आजपर्यंत ते पिंपळगाव बाजार समितीवर सभापती आहेत. आमदार असतांना २००७ मध्ये निफाड कारखाना निवडणुकीत पॅनल उभा केला. स्वतसह चार संचालक विजयी झाले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली गेली असली तरी पराभव होत राहिला. दरम्यान, जिल्हा बँक निवडणूक लढविली. १५ वर्षांपासून जिल्हा बँकेवर संचालक असून काही काळ अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. २०१९ मध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली. २१ हजार मतांनी विजयी होत पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. जिल्ह्य़ात स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित आहेत. अनेक संस्था स्थापन केल्या असून त्या प्रगतीपथावर आहेत. राजकीय जीवनात अनेक संकटाला तोंड दिले पण संयम आणि जिद्दीने वाटचाल सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्ती मानले जातात. पिंपळगाव ग्रामपंचायत मध्ये बनकर यांची वहिनी सरपंच असून पुतण्या गणेश बनकर सदस्य आहेत.
मौलाना मुफ्ती इस्माईल (मालेगाव मध्य, एमआयएम )
मौलाना मुफ्ती इस्माईल (एमआयएम) मालेगाव शहरातून विजयी झाले. धार्मिक नेता अशी त्यांची समाज तसेच राजकारणात ओळख आहे. त्यांचे शिक्षणही धार्मिक शिक्षण पध्दतीत झाले आहे. धार्मिक परवी, कादी, हाफिज, आलीम, मुफ्ती अशा विविध पदव्या त्यांनी संपादित केल्या आहेत. धार्मिक क्षेत्रात सक्रिय असतांना २००९ मध्ये तिसरा महाज म्हणजे जनसुराज्य पक्षाकडून प्रथमच त्यांनी विधानसभा निवडणुक रिंगणात उडी घेतली. त्या निवडणुकीत ते विजयी ठरले. २०१४ विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीस काँग्रेसचे आसिफ शेख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांचा त्यांनी पराभव करत मागील पराभवाचे उट्टे काढले.
हिरामण खोसकर (इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, काँग्रेस)
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारे हिरामण खोसकर यांनी शिवसेनेच्या आमदार निर्मला गावित यांचा पराभव केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा गटातील आडगांव-देवळा हे त्यांचे मूळ गाव. खोसकर यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले असले तरी १९९७ पासून समाजसेवा व लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद सदस्य, समाजकल्याण सभापती अशी वेगवेगळी पदे त्यांनी भुषविली आहेत.
राजकीय वारसा नसला तरी खोसकर यांनी राजकारणात सक्रिय राहत राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले. जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असून सध्या गोवर्धन गट जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते काम करत
होते. यामुळेच तालुक्यात त्यांची ‘आरोग्य दूत’ अशी ओळख आहे. वेळोवेळी संकटाला धावून येणारा, मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारा व्यक्ती म्हणुन त्यांचा नावलौकिक आहे. आदिवासी समाजाचे असले तरी समाजातील सर्वासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांची स्नुषा अर्पणा वामन खोसकर सध्या जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणून काम पाहत आहे.
याशिवाय पत्नी मैनाबाई यांनीही पंचायत समिती सभापती म्हणून काम पाहिले. त्यांची दोन मुले चंद्रकांत खोसकर आणि वामन खोसकर हे परंपरागत शेतीचा व्यवसाय करत आहे. त्यांना चार मुली असून सिंधुबाई बदादे, जनाबाई चौधरी, गुलाब पारधी या गृहिणी असून इंदुमती खोसकर या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. मतदार संघात शेतीसाठी पाणी, गावात पाण्याच्या योजना, रस्ते-आरोग्य, रोजगार आदी विषयांवर आवाज उठविण्याचा त्यांचा मानस आहे.
सरोज अहिरे (देवळाली, राष्ट्रवादी)
नाशिक महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती सरोज अहिरे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादी मध्ये गेल्या. पहिल्यांदाच अहिरे यांनी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उडी घेत विजयश्री संपादन केली. वडील बाबुलाल आहिरे हे देवळाली विधानसभेवर दोन वेळा आमदार राहिले. सरोज या कला शाखेच्या पदवीधर आहेत.
राजकारणात सक्रिय होत असतांना सरोज यांनी माजी मंत्री बबन घोलप यांची मुलगी नयना घोलप यांचा महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये पराभव केला. नाशिक महापालिकेत महिला बालकल्याण समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय चर्मकार उठाव संघ महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
महिला दिनानिमित्त दंत रोग निदान शिबीर त्यांनी घेतले. महिला व बालकल्याण सभापती असतांना अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण शिबीर घेतले, महापालिका विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला. मागील १० वर्षांपासून खंडित असलेला वंचित बालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले. महिलांसाठी व्यवसायिक वाहन शिबीर, बचत गट मेळावा व हाट बाजार संकल्पना राबविल्या. प्रभाग क्रमांक २२ मध्ये अनेक विकास कामे त्यांनी हाती घेतले. यंदाही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असल
दादा भुसे (मालेगाव बाह्य़, शिवसेना)
राज्यमंत्री दादा भुसे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. भुसे यांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. स्वातंत्र्यसैनिक दगडू भुसे यांचे पुत्र अशी त्यांची ओळख. स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका मिळवल्यावर काही काळ त्यांनी पाटबंधारे खात्यात नोकरी केली. नोकरीच्या काळात ठाणे येथे असतांना दिवंगत सेना नेते आनंद दिघे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे सरकारी नोकरीचा राजीनामा देत जाणता राजा या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मालेगाव येथे सामाजिक कार्यात काम करण्यास सुरूवात केली. कालांतरांने हिंदू नेता अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढतांना राष्ट्रवादीचे प्रशांत हिरे व भाजपचे प्रसाद हिरे या दोघा चुलत बंधूना पराभूत करून त्यांनी सर्वाना चकित केले होते. आमदारकी मिळविल्यानंतर सेनेत दाखल झालेल्या भुसेंनी २००९च्या निवडणुकीत ही जागा कायम राखण्यात यशस्वी झाले. तिसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर भुसे यांना राज्यमंत्रीपद मिळाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत चौथ्या वेळेस त्यांच्या मतात भर पडली आहेत. ५५ वर्षीय भुसे यांना मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील जनतेशी जुळलेली घट्ट नाळ या वैशिष्टयामुळे त्यांचा विजय सुलभ झाला.
डॉ. राहुल आहेर (चांदवड, भाजप)
नाशिक येथील डॉ. राहुल आहेर यांना वडील दौलतराव आहेर यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. मागील विधानसभा निवडणुकीत चांदवड-देवळा मतदार संघातून आमदार म्हणून त्यांची कामगिरी पाहता यंदाही या मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. सलग दुसऱ्यांदा ते विधानसभा मतदार संघात विजयी ठरले. आहेर उच्च विद्याविभुषित असून अस्थिरोग तज्ञ म्हणून शहरात वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. राजकीय क्षेत्रात सक्रिय असतांना वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते प्राधिकृत अध्यक्ष आहेत. तसेच राजलक्ष्मी अर्बन-को ऑप बँक, कसमादे परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. नाशिक अर्बन बॅक्स असोसिएशनचे संचालक असून जे.सी.आय. नाशिकचे कार्यकारी सदस्य आहेत. महाराष्ट्र विधानमंडळ धर्मदाय समितीचे सदस्य आहेत. नाशिक महानगरपालिकेत माजी नगरसेवक राहिलेले डॉ. आहेर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम पाहिले. ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य विषयक शिबीरे राबवली. त्या संदर्भात जनजागृतीच्या माध्यमातून रक्तदान शिबीरे, एड्स जनजागृतीसाठी त्यांनी काम केले. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाठी उपलब्ध करून दिल्या.
छगन भुजबळ (येवला, राष्ट्रवादी)
अतिशय चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संभाजी पवार यांच्याशी टक्कर देत येवलेकरांनी चौथ्यांदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात विजयाची माळघातली आहे. राजकारण कोळून प्यायलेली हे व्यक्तीमत्व घोटाळ्यातील चौकशीसाठी दोन वर्ष तुरूंगवासात होते. यामुळे त्यांचा मतदार संघाशी त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र कारागृहातून वेगवेगळ्या विषयांवर-प्रश्नांविषयी त्यांनी आवाज उठविला. येवलावासियांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी मांजरपाडा प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्णत्वास नेले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आलेले अपयश पाहता ही विधानसभेची निवडणूक त्यांच्या साठी राजकीय अस्तित्वेची लढाई होती. त्यात ते विजयी झाले. नाशिक येथे जन्मलेल्या भुजबळ यांची खरी कारर्किद घडली ती मुंबईत. मुंबई महापालिकेत १९७३ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषविल्यानंतर सलग दोन वेळा ते महापौर झाले. मुंबईच्या शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शिवसेनेला सोडचिठ्ठी देत ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्व स्विकारत भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. १९८५ व १९९०अशा दोन वेळा भुजबळ मुंबईतील माझगाव मतदार संघातून विजयी झाले. राज्याचे महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम पर्यटन अशा विविध विभागांच्या मंत्रिपदाची जबाबजदारी त्यांनी सांभाळली आहे. महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करून ओबींसीचे नेते म्हणून त्यांनी देशपातळीवर संघटना करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्यांपैकी एक असणाऱ्या भुजबळ यांनी या पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. राजकारणा व्यतिरिक्त चित्रपट आणि क्रिकेट यांची आवड असणाऱ्या भुजबळांनी दैवत आणि नवरा-बायको या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.
माणिक कोकाटे (राष्ट्रवादी, सिन्नर)
सिन्नरचे माजी आमदार माणिक कोकाटे राजकीय क्षेत्रात आक्रमक व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. सततची पक्षांतरे आणि बेधडक व्यक्तव्ये, कार्यशैलीमुळे त्यांनी दोन्ही काँग्रेस मधील नेत्यांसह अनेकांना दुखावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून त्यांनी सिन्नर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी घेतली. कोकाटे यांचा या पूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप मध्ये राजकीय वावर होता. लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. विधानसभेसाठी शिवसेना भाजपची युती झाल्याने कोकाटे यांनी राष्ट्रवादीचे दार ठोठावले. कोकाटे याआधी १९९९, २००४ आणि २००९ असे सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. कोकाटे यांनी २००५ मध्ये नारायण राणे यांच्या सोबत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर ते २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. राणेंनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर कोकाटे यांनी वेगळा मार्ग निवडून भाजप मध्ये प्रवेश केला होता. माणिक कोकाटे विधीतज्ञ असून त्यांची मुलगी सिंमतीनी ही जिल्हा परिषद सदस्या आहे. नाशिक येथे शाळा सुरू केली. राजकारणात सक्रिय असतांना सिन्नर पाणी प्रश्न विषयी त्यांनी आवाज उठविला. आमदार असतांना सिन्नरच्या विकासासाठी त्यांनी उल्लेखनिय योगदान दिले.
नरहरी झिरवाळ (दिंडोरी, काँग्रेस)
कुठलीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेले नरहरी झिरवाळ दिंडोरी तालुक्यातील वनारे गावातील. सुरूवातीपासून राजकारणापासून तसे दूर होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिंडोरी तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कामास सुरूवात केली. त्या काळात दिंडोरी पश्चिम पट्टा फारसा प्रगत नसल्याने त्यांना आदिवासी उपाययोजना अंतर्गत पेट्रोल पंप वितरीत करण्यात आला. मात्र पुरेसे आर्थिक पाठबळ आणि अन्य पाठिंबा नसल्याने या व्यवसायात त्यांना अपयश आले. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी गावात शेतमजूर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. शेतमजुरी नसल्यावर त्यांनी नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहती मध्ये कामगार म्हणून काम केले. याच दरम्यान, १९८७-८८ मध्ये गावात सरपंच पदाची निवडणुकीचे वारे वाहत होते. गावातील शिकलेला मुलगा म्हणून झिरवाळ यांना काँग्रेस कडून सरपंच पदासाठी निवडणुक लढविण्यासाठी सुचविण्यात आले. झिरवाळ सरपंच म्हणून निवडणुक लढले आणि विजयी झाले. या निवडणुकीपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. सामान्य माणसांशी-त्यांच्या प्रश्नाशी नाळ जोडलेला माणुस अशी त्यांची ओळख. यानंतर दिंडोरी पंचायत समिती सदस्य, उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. २००२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडणुक लढविली. या निवडणुकीत ते विजयी झाले. २००९ मध्ये शिवसेनेचे धनराज महाले यांच्याकडून अवघ्या १४८ मतांनी त्यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत त्यांनी महाले यांचा १३ हजार मतांनी पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत विजयाची परंपरा कायम ठेवत ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
सुहास कांदे (नांदगाव, शिवसेना)
नांदगाव विधानसभा मतदार संघातून विजयी झाले सुहास द्वारकानाथ कांदे हे २००९ पासून सलग १० वर्षे या मतदार संघात कार्यरत आहेत. सुरुवातीला त्यांनी युवकांची मोठी फळी शिवसेनेच्या माध्यमातून उभी केली व संघटनात्मक बांधणी केली. शिवसेना पक्ष संघटनात्मक दृष्टीने वाढवून जिल्हा प्रमुख पदापर्यंत मजल मारली. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली. त्यावेळी राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्या विरुद्ध ५१ हजार मते घेतली पण युती नसल्याने भुजबळांनी त्यांचा १९ हजार मतांनी पराभव केला होता. त्याचा वचपा त्यांनी यावेळी काढला. नांदगाव मतदार संघात त्यांची मोठी शैक्षणिक संस्था तसेच ,पतसंस्था आहे. पाणी टंचाईच्या काळात त्यांनी स्वत: व्यक्तिगत खर्च करून मनमाडला टँकरने पाणी पुरविले. २०१४ नंतर त्यांनी जिल्हा बँक संचालक पदासह तालुक्यात शिवसेनेला चांगले यश मिळवून दिले. नांदगाव व मनमाड नगरपालिका ,दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्या, जि. प व पंचायत समित्यां मध्ये एकतर्फी बहुमतासह तालुक्यातील सुमारे ८० ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात घेतल्या. भुजबळांसमोर मोठे आव्हान निर्माण केले. कांदे पदवीधर असून त्यांचे वय ३९ वर्षे आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये पराभव होऊनही त्यांनी नाउमेद न होता पक्ष कार्य जोमाने सुरू ठेवले. त्यामुळेच यावेळी मोठय़ा विश्वासाने त्यांना या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती व त्यांनी तो विश्वस सार्थ ठरवून दाखविला. कांदे यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी असून जिल्हात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. त्यात फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्म अॅक्ट, बनावट कागदपत्रे, विना परवानगी प्रवेश, धमकावणे आदींचा समावेश आहे.
राहुल ढिकले (नाशिक पूर्व)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराचे प्रमुख पदाधिकारी असलेले राहुल ढिकले यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरला. वडील उत्तमराव ढिकले यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला. उत्तमराव ढिकले खासदार, आमदार राहिले. त्यांच्या सानिध्यात राहिलेले राहुल सुरूवातीपासूनच राजकारणात सक्रिय होते. मनसेच्या माध्यमातून त्यांनी नगरसेवक, स्थायी समिती सभापतीची जबाबदारी सांभाळली. ढिकले बी.एस.एल., एल.एल.बी. पदवीधर आहेत. वडिलांकडून मिळालेल्या राजकीय वारश्यासह क्रीडा, सामाजिक कामाची आवड त्यांनी जोपासली आहे. ढिकले यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कुस्ती स्पर्धेत नाशिक महापौर केसरी, १९९७ ते २००० सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिक शहराचे प्रतिनिधीत्व केले. १९९८ ते २००१ या कालावधीत कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले. सामाजिक कामात त्यांनी रक्तदान, आरोग्य शिबीर, दुर्बल घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ढिकले यांचे मोठे बंधू डॉ. सुनील शहरात अस्थिरोग तज्ञ म्हणून काम करत आहेत. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेवर डॉ. सुनील संचालक म्हणून काम पाहत आहेत. राहुल ढिकलेही वडील तसेच वडील बंधूच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण-समाजकारणात सक्रिय आहेत. पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या राहुल यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पराभव केला.