नाशिक: जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश धरणे कोरडीठाक झाली असून धरणसाठा आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मान्सूनचे आगमन झाले असले तरी जलसाठ्या भर पडण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे. जूनच्या पूर्वार्धात आळंदी, करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, केळझर, पुनद, माणिकपूंज ही १२ धरणे जवळपास कोरडीठाक झाली आहेत. याशिवाय वाघाड, दारणा, मुकणे, चणकापूर ही धरणेही तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. त्यामध्ये तीन ते पाच टक्क्यांच्या दरम्यान जलसाठा आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच हजार ४५९ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गतवर्षी हे प्रमाण १६ हजार ६८९ (२५ टक्के) म्हणजे जवळपास तिप्पट होते. काश्यपी धरणात (२३ टक्के), गौतमी गोदावरी (१०), पालखेड (२२), हरणबारी (सात), गिरणा (१२), कडवा (सात टक्के) इतकाच जलसाठा आहे. मान्सूनचे नुकतेच नाशिकमध्ये आगमन झाले. परंतु, मुसळधार स्वरुपात तो कोसळलेला नाही. सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाल्याशिवाय धरणांची पातळी उंचावणार नाही. पावसाने दडी मारल्यास गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते. मागील काही वर्षात जूनमध्ये दाखल होणारा पाऊस नंतर काही दिवस अंतर्धान पावल्याची उदाहरणे आहेत. यंदा धरणांची स्थिती नाजूक असून पाणी टंचाईची झळ सर्वत्र जाणवत आहे. ती कमी होण्यासाठी मुसळधार पावसाची सर्वांना प्रतिक्षा आहे.

हेही वाचा : एकलहरे उपकेंद्रातील तीन रोहित्रांत बिघाड, नाशिकरोड परिसर अंधारात

गंगापूरमध्ये २० टक्के पाणी

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ११५४ दशलक्ष घनफूट म्हणजे २० टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात ३७ टक्के म्हणजे २०९६ दशलक्ष घनफूट जलसाठा होता. जानेवारीत महापालिकेने शहरात पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पातळीवर हा निर्णय टाळला गेला. त्यामुळे मुसळधार पाऊस न झाल्यास शहरावर कपातीची टांगती तलवार लटकण्याची भीती व्यक्त केली जाते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water stock at dams of nashik district at eight percent only css