नंदुरबार : धुळ्यातील विश्रामगृहात पैसे कोणी ठेवले, कसे आले, ते आम्ही तर काही पाहिले नाही. न बघता आम्ही कसे सांगायचे की ते कोणी आणून ठेवले असेल आणि षडयंत्र आहे असे. हे पैसे कोणी ठेवले आणि कोणी बघितले त्याला विचारले पाहिजे. आम्हांला तर काही पैसे मिळाले नाहीत. मिळाले असते तर निश्चित सांगितले असते. समितीवर आरोप करणाऱ्याने समिती सदस्यांना पैसे दिले गेले, हे सिद्ध करावे, असे आव्हान विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी दिले आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणाचे सावट गुरुवारी समितीच्या नंदुरबार दौऱ्यावर दिसून आले. याच प्रश्नावरुन पत्रकारांनी समिती सदस्यांना भंडावून सोडले. समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी, हे सर्व प्रकरण समिती आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला. धुळे शासकीय विश्रामगृहातील १०२ नंबरची खोली आपल्या स्वीय सहाय्यकाची नसल्याचेही त्यांनी नमूद केले. संजय राऊत यांना चुकीचे आरोप करण्याची सवय आहे. त्यांना त्याचे आरोप करु द्या. समिती आपले काम करत आहे, असे खोतकर यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी समिती सदस्य सदाभाऊ खोत यांचे या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले असल्याकडे लक्ष वेधले. खोत यांनी चौकशी समितीचे समर्थन केले. निश्चितपणाने यात चौकशी व्हावी. जे सत्य आहे ते बाहेर येईल. शासनाने दिलेला निधी विकास कामांवर खर्च झाला की नाही, हे पाहण्याचे काम समितीचे आहे. जे कोण या रोकड प्रकरणात असतील त्यांची चौकशी होईल आणि त्यांना काय शिक्षा व्हायची ती होईल, असे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात इतर समिती सदस्यांनी बोलणे टाळले.