जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे बसस्थानक परिसरात शुक्रवारी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आकाश मोरे (३२, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) हा तरूण त्याच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी पाचोरा बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आला होता. त्याच वेळी भरधाव दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर १२ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने धाव घेतली. न्यायवैद्यक पथकाने पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रूग्णालयात रवाना केला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनीही येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पुढील तपासाला गती देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.
दरम्यान, पाचोरा शहरात गोळीबाराच्या घटनेनंतर ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही छायाचित्रण तपासण्यात आले. गोळीबाराच्या घटनेमागे पूर्व वैमनस्याचे कारण आहे की दुसरे काही, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. शहरात एरवी अनेक वेळा पूर्व वैमनस्यातून लहान- मोठ्या हाणामारीच्या घटना घडत असतात. मात्र, शुक्रवारी बसस्थानक सारख्या गजबजलेल्या परिसरात बेछुट गोळीबाराची घटना घडल्याने शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.