X
X

विमानतळ कामाच्या पूर्ततेविषयी संभ्रम

READ IN APP

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण कधी होणार यावरून केंद्र व राज्य सरकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण कधी होणार यावरून केंद्र व राज्य सरकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण सचिव आर. एन. दुबे यांनी हे उड्डाण २०२१ पर्यंत होणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे, तर याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळ डिसेंबर २०१९ मध्ये कार्यान्वित होईल या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला वेग आला आहे. सिडकोच्या वतीने करण्यात येणारी विमानतळपूर्व कामे अंतिम टप्यात असून प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर गणेशोत्सावनंतर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सात महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी या विमानतळावरून पहिले उड्डाण डिसेंबर २०१९ पर्यंत होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या घोषणेचा पुनरुच्चार त्यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या भारत-अमेरिका उद्योग परिषदेत केला. मात्र केंद्रीय नागरी उड्डाण सचिव दुबे यांनी गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या नागरी उड्डाण समितीच्या बैठकीत राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात नवी मुंबई विमानतळावरील पहिले उड्डाण हे सप्टेंबर २०२१ पर्यंत होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या विधानांनी विमानतळाच्या पहिल्या उड्डाणाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. पुढील वर्षी नवी मुंबईतील विमानतळ कार्यान्वित होईल या अपेक्षेने अनेक गुंतवणूकदार व विकासकांनी गृह तसेच वाणिज्य प्रकल्प हाती घेतले आहेत. गेली वीस वर्षे हे विमानतळ होण्याबाबत ताराखांचा संभ्रम निर्माण होत आहे. विमानतळाच्या कामात असलेला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा अडथळा बऱ्याच अंशी दूर झाला आहे.

सिडकोचे पुनर्वसन पॅकेज घेऊन घरे रिकामी न करणारे दोन हजार प्रकल्पग्रस्त आजही त्या दहा गावांत राहात आहेत. गणेशोत्सवानंतर प्रकल्पग्रस्त गावे सोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तोपर्यंत पावसाळाही संपणार आहे.

मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या अध्यक्षपदी आता प्रकल्पग्रस्त आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याची जबाबदारी नवीन अध्यक्षांवर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने नुकतीच अंतर्गत कामाचा विकास आराखडा तयार करण्याची निविदा प्रसिद्ध केली असून १० सप्टेंबपर्यंत ही तयारी पूर्ण होणार आहे. राज्य शासन जाहीर करीत असलेल्या मुदतीत हे विमानतळ होणार नाही असे केंद्र सरकारमधील नागरी उड्डाण राज्यमंत्र्यानी यापूर्वीही जाहीर केले होते.

23
X