नवी मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला २६६ मद्यपी वाहन चालकांवर तर वाहतूक नियमभंग करणाऱ्या २ हजार ३५७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ३१ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ सकाळी ६ पर्यंत लावण्यात आलेल्या बंदोबस्ता दरम्यान करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२५ सालाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईत सर्वत्र उत्साह दिसून येत होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागही सज्ज झाले होते. यात अतिउत्साहाच्या भरात मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची विशेष नजर होती. मद्य प्राशन करून गाडी चालवत असताना अपघाताची शक्यता जास्त असल्याने शहरातून जाणारे महामार्ग, शहरांतर्गत प्रमुख चौक, तसेच उरण पनवेल येथील शेतघराकडे जाणाऱ्या मार्गावर विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. जागोजागी संशयित वाहन चालकांची मद्यचाचणी घेतली जात होती. यात मद्य प्राशन करून वाहन चालवणारे २६६ वाहन चालक आढळून आले. त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक मद्यपी वाहन चालक तुर्भे भागात आढळून आले तर सर्वात कमी मद्यपी गव्हाण फाटा येथे आढळून आले.

हेही वाचा >>> राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये सुरू

या शिवाय सीटबेल्ट न लावणे, वेग मर्यादा उल्लंघन, सिग्नल तोडणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे आदी वाहतूक नियम भंग करणाऱ्या तब्बल २ हजार ३५७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात किंचित वाढ झाली आहे. २०२४ चे स्वागत करताना नवी मुंबईत २ हजार २२० जणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांत ३० ने वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कंत्राटी कामांमध्ये ‘नगरसेवक राज’, प्रशासकाच्या काळातही प्रभावी नगरसेवकांची चलती

गेल्या वर्षीच्या तुलनेत मद्यपी वाहन चालकात थोडी वाढ झाली आहे. मात्र कुठेही अनुचित प्रकार अपघात घडला नाही. अशी कारवाई ३१ डिसेंबर रात्री अधिक होत असली तरी अन्य दिवशीही त्यात सातत्य ठेवण्यात येणार आहे. – तिरुपती काकडे (पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा)

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील बिटचौकीनिहाय कारवाईचे आकडे

वाशी – २४

एपीएमसी – १५

रबाळे – २०

महापे- १३

कोपरखैरणे – १७

तुर्भे- ३२

सी वुड्स – १३

सीबीडी – १७

खारघर – १४

कळंबोली – २०

तळोजा – १६

पनवेल शहर- २२

नवीन पनवेल – १०

उरण – १३

न्हावाशेवा – १५

गव्हाणफाटा – ५

एकूण – २६६

वर्षअखेरीची मद्यपी चालकांवरील कारवाई

वर्ष – कारवाई

२०२३-२४ —- २३६

२०२२-२३ —–१६०

२०२१-२२—- २७

२०२०- २१ —- ४४

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 266 booked for drunk driving on new year in navi mumbai zws