वाहनचोरीच्या आठ घटना खांदेश्वर, खारघर, कामोठे व तळोजा या परिसरात घडल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. यामुळे वाहनचोरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त काय उपाययोजना करतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर असले तरी वाहनतळाचे पुरेसे नियोजन नसल्याने वाहनमालकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. मागील दोन वर्षांत (२०२१, २०२२) नवी मुंबईतून १९८९ वाहने चोरट्यांनी लंपास केली. त्यापैकी अवघ्या ६२५ वाहनांचा पोलिसांनी शोध लावला.
हेही वाचा >>> नवी मुंबई: मैत्रिणीला ५ व्या माळ्यावरून ढकलून दिल्याच्या आरोपावरून अटक; गुरुवारची घटना
हा काळ तत्कालीन आयुक्त बिपीनकुमार यांच्या नेतृत्वाचा होता. यामध्ये सर्वात जास्त वाहनचोरीची संख्या नवी मुंबईतील रस्त्याकडेला आणि रेल्वेस्थानक परिसरात उभ्या केलेल्या वाहनांची आहे. वाहनचोरीचे सत्र विद्यमान पोलीस आयुक्तांच्या कारकिर्दीत कमी झालेले नाही. खांदेश्वर पोलीस ठाण्यात ८ जून रोजी यामध्ये सेक्टर-१० मधील तीर्थराज सोसायटीमधून दुपारी ६५ हजारांची दुचाकी चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली तर ९ जूनला खांदेश्वर पोलीस ठाण्यात वाहनचोरीच्या दोन घटना नोंदविल्या गेल्या. यामध्ये कोप्रोली येथे राहणारे जयेश खोत यांची सकाळी साडेदहा वाजता आणि मयूर पटेल यांची सेक्टर-१७ येथे उभी केलेली २५ हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेली.
हेही वाचा >>> नवी मुंबई : जेवणाचे ताट डोक्यात मारून हत्या, मृत आणि आरोपी दोन्ही मनोरुग्ण
याच दिवशी अजहर पटेल यांची रात्री तळोजा गावातील मशिदीजवळ उभी केलेली ३० हजार रुपयांची मोटर चोरीस गेली. तसेच १० जूनला खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूस उभी केलेली अजयकुमार पांडे यांची पंधरा हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेली. त्याच दिवशी खारघर वसाहतीमध्ये दोन वाहनचोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सेक्टर-२० येथील ही दोन्ही वाहने आहेत. सायंकाळी सहा वाजता बिटामॅक्स दुकानासमोरून ६० हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेली. तसेच अडीच लाख रुपये किमतीची मोटारकार ‘शुभ होम’ या इमारतीमधून चोरीस गेली. तर ११ जूनला म्हणजे रविवारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूकडे उभी केलेली २५ हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे.