नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकावर १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीशी छेडछाड केल्याप्रकरणी एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी शनिवारी सकाळी सुमारे ११.४० वाजता महाविद्यालयातून घरी परतत होती. वाशी स्थानकात ही तरुणी मोबाईलवर बोलत असताना, आरोपी तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याने तिला अयोग्य रीतीने स्पर्श केला.

यावर तरुणी संतापली आणि तिने थेट स्थानकावर तैनात असलेल्या महिला जीआरपी कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. परंतू, आरोपीने तोपर्यंत घटनास्थळावरुन पळ काढली होती. जीआरपी महिला कर्मचारी सोबत तरुणीने जीआरपी कार्यालयात जाऊन आरोपी संदर्भात तक्रार नोंदवली.

या तक्रारीची दखल घेत, जीआरपी पोलिसांनी सिसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली. त्या आरोपीचा राहण्याचे ठिकाणी शोधून अखेल सोमवारी त्या आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली, अशी माहिती वाशी जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली.