नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत हालचालींना वेग आला आहे. अशातच इतकी वर्षे मागणी करूनही अद्याप नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले न गेल्याने शहरातील आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे. शहरात प्रशासनाकडून लावण्यात येणारे नवी मुंबई विमानतळाचे नाम फलक ग्रामस्थांनी काढायला लावले आहेत. दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी करत प्रशासन जाणूनबुजून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

येत्या ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात येईल असे म्हटले जात आहे. यासाठी नवी मुंबई शहरात जय्यत तयारी सुरू असून, प्रशासनाकडून नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विमानतळाचे दिशानिर्देश फलक लावण्यात येत आहेत. मात्र, इतकी वर्षे आग्रही मागणी करूनही अद्याप विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न मिळाल्याने आगरी-कोळी समाजाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. या दिशानिर्देश फलकांवर दि. बा. पाटील यांचे नाव न देता केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे लिहिल्याने समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

असेच नाम फलक नेरुळच्या सारसोळे गाव सेक्टर-६ जवळ लावण्यात येत होते. या नाम फलकांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आणि हे नाम फलक तात्काळ हटवायला लावले. केंद्र शासनाने विमानतळाचे नामकरण केलेले नसताना शहरात ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने फलक कसे लावले जात आहेत? असा सवालही ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच, सर्व भूमिपुत्रांनी आपापल्या भागातही असे नाम फलक लावण्यात येत असतील तर त्यावर लक्ष ठेवा आणि जोपर्यंत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, तोपर्यंत हे फलक लावू देऊ नका असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांकडून सर्वांना करण्यात आले आहे.

नामकरणावरून राजकारण

गेल्या अनेक वर्षांपासून या विमानतळाच्या नामकरणावरून राजकारण सुरू आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाला स्थानिकांचा पाठिंबा असून, त्यांच्या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनीही समर्थन दिले आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या नामकरणासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही म्हटले जाते. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय न झाल्यामुळे स्थानिक समाजामध्ये नाराजी वाढत आहे.

….अन्यथा संघर्ष अटळ

नामफलक हटवण्याच्या या कृतीमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्र सरकारने अद्यापही दि. बा. पाटील यांच्या नावाचा अधिकृत निर्णय घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर भूमिपुत्र संघटना आणि स्थानिक समाज येत्या ६ ऑक्टोबरला विमानतळावर धडक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात लाखो भूमिपुत्र सहभागी होणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा या मोर्च्याचे नेतृत्व करणार असून, दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर न झाल्यास, विमानतळाचे उद्घाटन रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

विमानतळाचे लोकार्पण येत्या ८ ऑक्टोबरला होण्याची शक्यता असताना, केंद्राकडे नावाच्या प्रस्तावावर तीन वर्षांपासून निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकार्पणाच्या आधी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न मिळाल्यास सरकार विरुद्ध स्थानिक संघटना व समाजा असा संघर्ष अटळ मानला जात आहे.