उरण: जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपाला वेग देण्यासाठी सिडकोने सुरुवात केली असून ३ ऑक्टोबर पासून प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कागदपत्रासह दुपारी २ ते ५ वाजताच्या दरम्यान सिडको भवन भूमी विभाग तळ मजला येथे येण्याची सूचना करण्यात आली आहे. यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संचिका नुसार तारखा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १३ सप्टेंबरच्या सिडको भवनात घेण्यात आलेल्या सिडको व जेएनपीटी प्रशासनाच्या संयुक्त बैठकीतील निर्णयानुसार ही अंमलबजावणी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडको आणि जेएनपीटी प्रशासन वारंवार बैठका रद्द करीत होती त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे सिडको आणि जेएनपीटी अधिकाऱ्यांना चौथ्यांदा रद्द केलेली बैठक घ्यावी लागली. त्यातूनच साडेबारा टक्के भूखंड वाटपाच्या प्रकियेला वेग आला आहे. त्यामुळे जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप मार्च २०२४ पर्यंत करण्याचे आश्वासन ही सिडकोने दिले आहे. या संदर्भात प्रकल्पग्रस्तांनी आनंद व्यक्त केला आहे. याचा पाठपुरावा जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉ.भूषण पाटील यांनी पाठपुरावा कमिटीच्या माध्यमातून केला आहे.

हेही वाचा… पनवेल शहर पोलीस झाले ‘पर्यावरण दूत’ 

प्रकल्पग्रस्तांनी साडेबारा चा अर्ज,निवड्याची प्रत (सी सी पावती),गाव नमुना (सातबारा उतारा),ओळख पत्र,रहिवासी दाखला, रेशनकार्ड/मतदान पत्र/पॅन कार्ड,मृत्यू दाखला, जाहीर नामा, वारस दाखला, वारस दाखल्याचा चौकशी अर्ज,वारसाचे सत्य प्रतिज्ञा पत्र,हमीपत्र,प्रतिज्ञापत्र, बंध पत्र,मावेजा व बांधकाम अहवाला करिता भूधारकाचा अर्ज आदी कागदपत्रे लागणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allotment of jnpt developed plots project victims instructed to come to cidco bhawan with their documents dvr