यू टय़ूबवरील चित्रफित पाहून बँकफोडीचा कट

बँक ऑफ बडोदातील लॉकर रूमपर्यंत पोहोचण्यासाठी दरोडेखोरांनी उत्तर प्रदेशातून कामगार बोलावले होते आणि तब्बल पाच महिने भुयार खोदण्याचे काम सुरू असताना आजूबाजूच्या कोणलाही मागमूसदेखील लागला नाही. इमारतीतील रहिवासी आणि पोलिसांनाही कसलाच थांगपत्ता लागू न देता आणि कोणताही आवाज होऊ न देता भुयार कसे खोदण्यात आले, याचे गूढ कायम आहे.

या दरोडय़ाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पहिल्या पाच दिवसांतच आरोपींना अटक केल्यामुळे त्यांचे कौतुक होत असतानाच, एवढे मोठे भुयार खोदण्याचे काम तब्बल पाच महिने सुरू असताना पोलिसांना कोणतीच खबर कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जुईनगर सेक्टर ११ येथे असलेल्या भक्ती रेसिडन्सी इमारतीत गाळा क्रमांक १, २, ३, ४मध्ये बँक आहे. बँकेशेजारील तीन गाळे सोडून चौथा गाळा दरोडेखोरांनी खरेदी केला होता. गाळा क्रमांक सातपासून बँकेपर्यंत पाच ते बारा फूट खोल, अडीच फूट रुंद आणि अंदाजे ४५ ते ५० फूट लांब भुयार खोदण्यात आले होते. तब्बल पाच महिने एवढे मोठे ५० फुटांचे भुयार खोदले जात असताना कोणालाच कोणताही आवाज कसा आला नाही, या प्रश्नाने पोलीसही चक्रावले आहेत. ही इमारत जुईनगर सेक्टर ११मध्ये रस्त्यालगतच आहे. दररोज हजारो नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. बँक व इमारतीच्या परिसरात असलेले गाळेधारक, इमारतीतील रहिवासी यांना पाच महिन्यांत कसलीच शंका न आल्यामुळे सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या गुह्य़ातील आरोपी दीपक मिश्रा ऊर्फ टेंगूर याने भुयार खोदण्यासाठी उत्तर प्रदेशातून कमलेश, आदेश, शुभम आणि सूरज या चौघांना आणले होते. ते भुयार खोदत असतानाच्या काळात दरोडेखोर आपली वाहने रस्त्यावर पार्क करून बाहेरील घडामोडींवर लक्ष ठेवत. त्यांनी संपर्कासाठी मोबाइल फोनऐवजी चिनी बनावटीचा वॉकीटॉकी वापरला होता. ११ नोव्हेंबर रोजी बँक बंद झाल्यानंतर रात्री ११च्या सुमारास त्यांनी बँकेतील लॉकर रूमची जमीन फोडली आणि ते लॉकररूममध्ये घुसले. आरोपी हाजीद अली, दीपक मिश्रा, सूरज आणि आदेश असे चौघे त्या वेळी हजर होते.

कट असा रचला

  • मुख्य आरोपी हाजीदअली सबदरअली मिर्झा बेग ऊर्फ अज्जू ऊर्फ लंगडा, श्रावण कृष्णा हेगडे ऊर्फ संतोष तानाजी कदम ऊर्फ काल्या, मोईद्दीन अब्दुल सिराजमिया शेख ऊर्फ मेसू, दीपक दयाराम मिश्रा ऊर्फ टेंगूर, गेनाबच्चन प्रसाद ऊर्फ भवरसिंह राठोड असे सर्व जण घरफोडीच्या गुन्हातील आरोपी आहेत. त्यांची मुंबई, पुणे, नाशिक येथील तुरुंगांत भेट झाली होती.
  • २०१४ मध्ये एका टोळीने हरियाणा सोनिपत येथील पंजाब नॅशनल बँकेत भुयार खोदून बँक लुटल्याचा व्हिडीओ त्यांनी यू-टय़ूबवर पाहिला होता, त्यावरून त्यांनी त्याच पद्धतीने बँक फोडण्याचा निर्णय घेतला. या चोरीनंतर मोठा हात मारून पुन्हा या क्षेत्राकडे वळायचे नाही, असे ठरवत त्यांनी कट रचला.
  • हाजीदअली याने वेगवेगळ्या गँग बनवून कट अमलात आणण्याचे ठरवले. वेगवेगळ्या तुरुंगांत असलेल्या साथीदारांना जामीन मिळाल्यानंतर हाजीदअलीने एप्रिल २०१७ मध्ये घाटकोपरमधील असल्फा व्हिलेज, जागृती नगर तसेच नवी मुंबईत बँक ऑफ बडोदावरील दरोडय़ांचा कट रचला.
  • त्यासाठी त्याने साडेआठ लाख रुपये उभे केले. ठाणे आणि नवी मुंबईतील ज्या बँकांमध्ये लॉकरची सुविधा आहे आणि त्यांच्या शेजारचा गाळा मोकळा आहे, अशा ठिकाणांचा शोध सुरू केला. बँक ऑफ बडोदात दरोडा टाकण्याचा निर्णय घेतला. लुटलेल्या मालाच्या वाटाघाटी

बँकेतील ३० लॉकरमधील लुटलेल्या ऐवजापैकी भुयार खोदणाऱ्या आदेश, शुभम आणि सूरज या तिघांना सुमारे एक किलो सोने आणि प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन मुंबईबाहेर रवाना करण्यात आले. त्यानंतर या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी कालिना नाका येथील हाजीदअली याच्या घरी गेले. रस्त्यात त्यांनी दीपक मिश्राला सव्वा किलो सोने आणि पाच हजार रुपये देऊन उत्तर प्रदेशात रवाना केले. दुसऱ्या दिवशी १३ नोव्हेंबरला आरोपी श्रावण हेगडे, मोईनुद्दीन शेख, हाजीदअली चोरीच्या सोन्यामधील सुमारे एक किलो ८०० ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन मालेगाव येथील सोनार राजेंद्र वाघ याच्याकडे गेले. त्या वेळी राजेंद्र वाघ याने दोन ते तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने २८ लाख रुपये देतो, असे सांगून २५ लाख ५० हजार रुपये दिले. त्यातील सहा लाख ५० हजार रुपये मोईनुद्दीन शेख याला, ११ लाख रुपये श्रावण हेगडे याला देण्यात आली तर उर्वरित सर्व रक्कम हाजीदअली मिर्झा बेग याने घेतली.

तांत्रिक तपास

बँक ऑफ बडोदावर दरोडा टाकल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी तांत्रिक माहिती, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून मिळवली. वाहनांचे क्रमांक मिळविले. त्यानंतर  पोलिसांनी चार आरोपींना अटक करून गुन्ह्य़ात वापरलेली वाहने जप्त केली. त्यांच्या चौकशीनंतर इतर सात आरोपींना अटक केली.

स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, झाडूची काडी

लॉकररूममध्ये घुसल्यानंतर चोरांनी कटरच्या साहाय्याने लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे खूप आवाज होत होता. त्यामुळे त्यांनी स्क्रू ड्रायव्हर, तार, कटावणीचा वापर केला. प्रत्येक लॉकर तोडण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागल्याने आणि सुरुवातीचे ४०-४५ लॉकर रिकामे असल्याने त्यांनी चावी लावण्याच्या जागेतून तार किंवा झाडूची काडी टाकून आतमध्ये ऐवज असल्याची खातरजमा करून लॉकर तोडण्यास सुरुवात केली. सकाळी ७.३० पर्यंत त्यांना ३० लॉकर तोडता आले. त्यानंतर सुगावा लागण्याच्या भीतीने त्यांनी मिळालेला ऐवज घेऊन दोन गाडय़ांतून पोबारा केला.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस चोख बजावतात. पण नागरिकांनीही जागरूक राहिले पाहिजे. सर्वाच्या सहकार्याने पोलीस आपले कर्तव्य अधिक सक्षमपणे बजावू शकतात. पोलिसांच्या तत्परतेमुळेच बँकफोडीची लवकर उकल झाली.

किरण पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस