उरण : विविध कारणांनी उरणमधील अनेक पाणथळींची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्ष्यांच्या संख्येत घट होऊन ती एक लाखापेक्षा अधिक ने कमी झाल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ही येथील जैवविविधतेसाठी चिंतेची घंटा ठरत आहे.उरणचे खाडीकिनारे आणि पाणथळी या हजारो पक्ष्यांचे खासकरून फ्लेमिंगोंचे उरण हे एक ठिकाण महत्त्वाचे आहे. मात्र मातीचा भराव, वाढती उष्णता विविध कारणांमुळे येथील पाणथळी झपाट्याने नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे परिसरातील छोट्या पाणथळींवर पक्षी आपल्या अन्नाच्या शोधत येऊ लागले आहेत. मात्र या पाणथळी आणि येथील अन्न केव्हापर्यंत असेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण परिसरात साधारणपणे ऑक्टोबर अखेरपर्यंत अनेक जातींचे पक्षी येथील पाणथळीवर दाखल होतात. उरणच्या जेएनपीटी बंदर परिसर पाणजे, फुंडे, जासई, करळ आदी भागांतील पाणथळींवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने पक्षी येतात. हे पक्षी पाहून त्यांचे निरीक्षण करण्यासाठी शेकडो पक्षीप्रेमी या भागात येतात. याचे मुख्य कारण म्हणजे येथील खाडीत मिळणारे या पक्ष्यांचे अन्न आहे. अनेक वर्षांपासून हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत येथे येत आहेत.हजारो स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचे ठिकाण असलेल्या प्रमुख पाणथळ जागा एकतर गाडून टाकल्या जातात किंवा आंतरभरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखून पद्धतशीरपणे नष्ट केल्या जात आहेत. उरणच्या मोठ्या पाणथळ जागा नष्ट झाल्याने सध्या अनेक पक्षी हे उरण-पनवेल मार्गावरील उरण रेल्वे स्थानकाच्या शेजारील भरतीचे पाणी साचत असलेल्या पाणथळ परिसरात येत आहेत. ही पाणथळीसुद्धा काही दिवस उपलब्ध असतील. त्यानंतर या पक्ष्यांना खाद्यपदार्थ शोधत बसावे लागणार आहे.

पाणथळी बुजल्याने उरणमधील लाखभर पक्षी संख्या कमी

उरणच्या पाणथळी वेगाने नष्ट होत आहेत. त्यामुळे येथील पाणथळीवर येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्षी संख्या घटून ती जवळपास एक लाखाने कमी झाल्याचे मत पर्यावरणवादी बी. एन. कुमार यांनी व्यक्त केले आहे. तर पक्षी हे जैवविविधता राखणारा महत्त्वाचा दुवा तसेच वातावरण आणि पाणी स्वच्छ ठेणारे देवदूत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

‘लाल मानेचा फलारोप’

उरण तालुक्याच्या पाणथळी भागात नुकतेच दुर्मिळ समजले जाणारे ‘लाल मानेचा फलारोप’ आणि ‘ठिपक्यांचा टिलवा’ या पक्ष्यांचे फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण रायगड संस्थेचे वन्यजीव अभ्यासक व पक्षनिरीक्षक निकेतन रमेश ठाकूर यांना २८ एप्रिल २०२५ रोजी बेलपाडा येथील पाणथळींमध्ये दर्शन झाल्याने या भागाचे जैवविविधतेतील अनमोल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. उरणच्या पाणथळी जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असून, ती अनेक दुर्मिळ व संकटग्रस्त पक्ष्यांना आश्रय देत आहेत. अशा ठिकाणांचे संरक्षण आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे मत जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird numbers in uran dropped over one lakh due to declining wetlands say environmentalists sud 02