पनवेल : नवी मुंबई आणि पनवेल परिसरात अनधिकृत बांधकामांवर सिडको मंडळाच्या दक्षता विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईची दिवसभर जोरदार चर्चा रंगली होती. बेलापूर येथे आणि शिरढोण गावालगत केलेल्या या कारवाईमुळे नैना प्राधिकरणाच्या अधिसूचित क्षेत्रात परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या ढाबे व हॉटेलमालकांचे धाबे दणाणले आहेत. सिडकोची पहिली कारवाई मंगळवारी बेलापूर नोडमधील सेक्टर १५ अ येथील मौजे शहाबाज सर्व्हे क्रमांक २५७ आणि २६४ येथील सुमारे १००० चौ. मी. भूखंडावर करण्यात आली.

येथे काही बांबू–ताडपत्री झोपड्या, पत्रा शेड टाकून मजूरांसाठी तात्पुरती घरे उभारण्यात आली होती. इतकेच नव्हे तर एका कंटेनरमध्ये कार्यालयही थाटण्यात आले होते. सिडकोची परवानगी न घेता या भूखंडावरील अतिक्रमन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. तसेच दुसरी कारवाई पनवेलमधील शिरढोण गावालगत झाली. येथील एका शेतमालकाने मुंबई–गोवा महामार्गालगत आपल्या शेतजमिनीवर सिडकोची परवानगी न घेता सातबारा नावाचे हॉटेल उभारले होते. या बांधकामासाठी परवानगी न घेतल्याने हे बांधकाम संपूर्णपणे अनधिकृत ठरवून सिडकोने जेसीबीच्या सहाय्याने ते पाडून टाकले.

या कारवाईमुळे पनवेलमध्ये महामार्गालगत विना परवानगीने बांधलेल्या ढाब्यांवर अशीच कारवाई यापुढे सिडको करणार असल्याने इतर ढाबे व हॉटेल मालकांमध्ये घबराट पसरली आहे. ही संपूर्ण मोहीम सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सूरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. तसेच मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर येथे राबविण्यात आलेल्या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पोलिस, सिडको पोलिस पथक, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे रक्षक यांचा सहभाग होता. या कारवाईसाठी एक जेसीबी, २ जीप, १ टेम्पो ट्रॅव्हलर व ५ कामगारांची मदत घेण्यात आली.सिडकोने स्पष्ट केले की, परवानगीशिवाय उभारलेली कोणतीही बांधकामे कायद्याने मान्य होणार नाहीत.

त्यामुळे नागरिकांनी नियमावलीचे पालन करावे, अन्यथा अशाच प्रकारे कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सिडकोकडून देण्यात आला आहे. नैना क्षेत्रातील शिरढोण गावातील ज्या हॉटेलवर कारवाई झाली ती जागा परप्रांतिय शेतक-याची असल्याने या कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक शेतकरी एकवटले नाहीत. मात्र नैना प्राधिकरणातील रस्ते बांधण्यापूर्वी सिडकोने शेतक-यांशी वाटाघाटी न करता अशापद्धतीने स्थानिकांच्या हॉटेलवर कारवाई केल्यास त्यास विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.