Cidco Extends Registration Deadline: सिडकोची घरं हा सध्या मुंबई महानगरातील जनसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत Cidco कडून नवी मुंबईत तब्बल २६ हजार स्वस्तातील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी सिडकोकडून अर्ज नोंदणीचं आवाहन करण्यात आलं असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता सिडकोनं अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे मुंबईच्या जवळ नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सामान्यजनांना दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौथ्यांदा दिली मुदतवाढ

सिडकोनं दिलेल्या मुदतवाढीसंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं असून त्यानुसार अर्ज करण्यासाठी सिडकोनं दिलेली चौथी मुदतवाढ आहे. त्यानुसार आता २५ जानेवारीपर्यंत सिडकोच्या या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. आत्तापर्यंत जवळपास ५५ हजार अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केल्याचंही या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

सिडकोची ही २६ हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (वार्षिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत) व अल्प उत्पन्न गटाकरता (वर्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त) नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोड परिसरात उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या घरांच्या किमती २५ लाखांपासून ४८ लाखांपर्यंत असतील. तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांच्या किमती ३४ लाख ते ९७ लाखांच्या दरम्यान असतील.

दरांवरून नाराजी, Cidco नं दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, सिडकोनं जाहीर केलेले दर जास्त असल्याच्या प्रतिक्रिया येत असून ते दर कमी होणार असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. पण आता हे दर कमी होणार नसल्याचं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “आम्ही बांधलेली घरं उत्तम दर्जाची आहेत. अर्जदार प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन सॅम्पल फ्लॅट बघू शकतात. त्यामुळे आम्ही एवढे दर का ठेवले आहेत याची खात्री अर्जदारांना पटेल. जमिनीचे दर, घराचा दर्जा आणि ठिकाण या गोष्टी पाहून दर ठरवण्यात आले आहेत”, असं सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं.

Cidco च्या घरांचे दर

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) गट

तळोजा सेक्टर २८ – २५.१ लाख
तळोजा सेक्टर ३९ – २६.१ लाख
खारघर बस डेपो – ४८.३ लाख
बामनडोंगरी – ३१.९ लाख
खारकोपर २ए, २बी – ३८.६ लाख
कळंबोली बस डेपो – ४१.९ लाख

अल्प उत्पन्न घटक (LIG) गट

पनवेल बस टर्मिनस – ४५.१ लाख
खारघर बस डेपो – ४८.३ लाख
तळोजा सेक्टर ३७ – ३४.२ लाख ते ४६.४ लाख
मानसरोवर रेल्वे स्थानक – ४१.९ लाख
खांदेश्वर रेल्वे स्थानक – ४६.७ लाख
खारकोपर पूर्व – ४०.३ लाख
वाशी ट्रक टर्मिनल – ७४.१ लाख
खारघर स्थानक सेक्टर १ए – ९७.२ लाख

कसा कराल Cidco च्या घरासाठी अर्ज?

संबंधित सोडतीच्या प्रक्रियेमध्ये अर्जनोंदणीसाठी इच्छुक https://cidcohomes.com सिडकोच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतील. अधिक माहितीसाठी ९९३०८७०००० व ८०६२३६८००० या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतील.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco homes in navi mumbai appliacation deadline for 26000 houses extended pmw