मुंबई : नवी मुंबईतील सिडकोची सुमारे पाच हजार कोटी रुपये किंमतीचा भूखड बिवलकर कुटुंबाला दिल्याच्या प्रकरणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी लोकायुक्तांची भेट घेतली आहे. या प्रकरणाची कागदपत्रे त्यांना सादर केली जातील. हजारो कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार सरकारला पचू देणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.
रोहित पवार यांनी या प्रकरणी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश प्रसारीत करून या प्रकरणाला पुन्हा वाचा फोडली आहे. नवीन मुंबईतील सिडकोच्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा भूखंड बिवलकर कुटुंबाला बेकायदा पद्धतीने दिल्याच्या प्रकरणाची राज्य सरकारकडे तक्रार करण्यात आली.
पण, राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी राज्याचे लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालयातील प्रबंधकांची भेट घेऊन चर्चा केली. प्रक्रिया समजून घेऊन तक्रारीची कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली. या कार्यालयाच्या प्रक्रियेनुसार त्यांना लागणाऱ्या अधिकच्या कागदपत्रांची पूर्तताही लवकरच केली जाईल. पण कोणत्याही परिस्थितीत सिडको आणि सरकारचा हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पचू देणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
भूमिपुत्रांसाठी लढू आणि जिंकू भ्रष्टाचाऱ्यांच्या नाड्या आवळण्यापासून दूर पळणारे सरकार आता तरी भानावर येईल. मुख्यमंत्री महोदयांनी मागितल्याप्रमाणे या प्रकरणाचे सर्व पुरावे उघड केले आहेत. समाज माध्यमांच्या द्वारे सर्व पुरावे त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोच केले आहेत. परंतु या पुराव्यांचे त्यांनी काय केले, हे पहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या त्यांच्या वाक्याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडणार नाही, अशी अपेक्षा ही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.