नवी मुंबई – नवी मुंबईतील घणसोली परिसरात दोन वेगवेगळ्या बेकायदा बांधकामांवर सिडकोच्या नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) विभागाने सोमवारी कारवाई करत हातोडा मारला. तसेच करंजाडे वसाहती परिसरात बेकायदा राडारोडा वाहतूक करणारे दोन डंपर सिडको आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले.

घणसोली येथील साईविरा या पाच मजली इमारतीत ६८ सदनिका, चार दुकाने आणि एक सोसायटी कार्यालय अशा बेकायदा बांधकामामुळे ही इमारत चर्चेत आली होती. या इमारतीमधील बांधकामांना अभय मिळावे यासाठी बांधकामधारकांनी मुंबई उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागीतल्याने या बेकायदा बांधकाम केलेल्या इमारतीला न्यायालयातून संरक्षण मिळेल याकडे नवी मुंबईतील अनेक बेकायदा बांधकामधारकांचे लक्ष्य लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने सिडकोने सुरूवातीपासूनचा बेकायदा बांधकामाचा पवित्रा कायम ठेवला अखेर सोमवारी सिडकोने स्थानिक राजकीय शक्तींचा विरोध झुगारून या इमारतीचे पाडकाम सुरू केले. 

सध्या निवडणूकांचे वारे वाहू लागल्याने या इमारतीचे पाडकाम थांबविण्यासाठी राजकीय शक्तीचा करिश्मा होईल असे वाटले होते. मात्र असा कोणत्याही दबावतंत्राला यश न मिळाल्याने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली आणि सिडको दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी अखेर या इमारतीवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान २१ सदनिकांचे पाडकाम करण्यात आले. याचबरोबर घणसोली सेक्टर १६ मधील तळवली गावातील सर्वे क्रमांक १७५ व १८३ येथील रमेश जाधव आणि विकसक हैदर अली यांनी केलेल्या एक मजली बेकायदा बांधकामानंतर जुलै महिन्यात बेकायदा बांधकाम केल्याची नोटीस सिडकोने बजावण्यात आली होती. मात्र या नोटीस कारवाईची दखल न घेतल्याने सिडकोने सोमवारी जाधव व हैदर अलि यांनी केलेल्या बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले.

दरम्यान, करंजाडे सेक्टर ३ मध्ये ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन अवैध राडारोडा वाहतूक करत असताना दोन डंपर पकडण्यात आले. ही वाहतूक थांबवून डंपरचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिडकोच्या या धडक कारवाईमुळे नवी मुंबईतील बेकायदा बांधकामधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.