लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई: ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळवून व्यवसायवृध्दी व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात येते . त्याचबरोबर आमच्या सरकारचा महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरणासाठी जिल्हा स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदा वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

उमेद अभियानाअंतर्गत महिला बचतगट आणि या माध्यमातून करत असलेल्या त्यांच्या परिश्रमाला व्यवसायाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक प्रकारे उभारी मिळते, शिवाय त्यांचा खरीददार वर्गही वाढतो. गेला १७ ते १८ वर्षांपासून हे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे . करोना दरम्यान मात्र हे बंद होते. तसेच मागील वर्षी या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून १६ कोटींची उलाढाल झाली होती. तेच यंदा २५ कोटी उलढाल होण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामविकास योजनेअंतर्गत राज्यभरातील जवळजवळ ६ लाख बचत गटाच्या माध्यमातून ६० लाख महिला याच्याशी जोडल्या गेल्या आहेत.

ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल यापूरते सीमित न राहता त्यांचा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे आहे. महिला बचतगट आणि महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. जिल्हा स्तरावर सरकारी जागेत बाजारपेठ उपलब्ध करून देत येईल का? यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना बाजारपेठ उपलब्ध झाली तर व्यवसाय सुलभ होईल, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्तन कर्करोगाबाबत प्रशिक्षण दिलं तर महिलांची या कामात मदत होईल,असे मत यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

आणखी वाचा- मुंबई विमानतळावरून ५४ कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त, झांबियातून तस्करी करणाऱ्या दिल्लीतील महिलेला अटक

या प्रदर्शनात महाराष्ट्रासह इतर राज्यातील बचत गट माध्यमातून उत्पादकांनी आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन मांडले आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये ५५० स्टॉल असून यामध्ये महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण १५० स्टॉल येणार आहेत. प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपन्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल आहेत. यामध्ये घरगुती, स्वच्छ आणि सेंद्रिय खते वापरून पिकवलेले धान्य, पापड, लोणचं, देशी मध ,पौष्टिक लाडू, चिवडा अशा विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तसेच औषधी वनस्पती इत्यादी वस्तू प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

तसेच हस्त कलेच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साडया, ज्युटच्या वस्तू, बांबू – लाकडी वस्तू, लेदरच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बुट, खेळणी, ड्रेस मटेरीयल, साडी, बेडशीट, कारपेट, पडदे इत्यादी कलाकुसर केलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या आहेत, तसेच विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमच्या उत्पादनाला एक बाजारपेठ उपलब्ध होत असून त्याची विक्री ही होत आहे, असे मत ययेथील स्टॉल धारकांनी व्यक्त केले आहे.

आणखी वाचा- नेरुळ विभागामध्ये कोट्यांवधीची वीजचोरी उघड करण्यात महिलांचे योगदान, २.३१ कोटींची विक्रमी वसुली

गेले दहा वर्षांपासून मी या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सहभागी होत आहे . या प्रदर्शनामुळे आमच्या सर्व प्रकारच्या लोणचं उत्पादनांना विक्रीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होत आहे . तसेच आमच्या व्यवसायाची वृद्धी देखील होत आहे. सुरुवातीला आम्ही अगदी छोटासा व्यवसाय सुरू केला होता, परंतु आता वटवृक्ष तयार झाला असून अनेक महिलांना रोजगार ही उपलब्ध झाला आहे.
सुनीता अशोक चौधरी, गोदावरी महिला बचत गट

या महालक्ष्मी प्रदर्शनातून आमच्या उत्पादन विक्रीसाठी पूरक बाजारपेठ उपलब्ध होत आहे. काही नागरिक प्रदर्शनात भेटीदरम्यान संपर्क नंबर घेऊनही नंतर वस्तू मागवतात. आमच्या इथे विविध प्रकारचे पौष्टिक लाडू, साजूक तूप, सुकामेवा मिश्रण आणि उत्तम सेंद्रिय गूळयुक्त चिक्की उपलब्ध आहे.
नितीन वाघ

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complementary market for women through mahalakshmi saras exhibition mumbai print news mrj