पावसाळ्यानंतर उर्वरित दुरुस्ती कामाला वेग
नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डय़ांमुळे नवी मुंबई महापालिकेला सातत्याने नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरच काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे तासन्तास तिष्ठावे लागत आहे. यावर उपाय म्हणून महामार्गावरील डांबरीकरणाच्या जागी काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मध्यंतरी पावसामुळे शिल्लक कामे सुरू करण्यात आली आहेत. नियोजित काम पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महामार्गावरील संपूर्ण कामासाठी एकूण ६८ कोटींचा खर्च अपेक्षित होता, परंतु वाढीव कामांमुळे हा खर्च १०८ कोटींवर पोहोचला आहे. पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कामासाठी मोठी कसरत करावी लागली असली तरी वाहकूकोंडीला सामोरे जावेच लागले.परंतू पावसाळ्यात वाहतूकीला अडथळा येणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारम्य़ांनी लोकसत्ताला दिली होती.पण अर्धवट कामामुळे ज्या ठिकाणचे कॉंRीटीकरणाचे काम झाले नाही त्याठिकाणी खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या.
वाशी टोल नाका ते कामोठे या महामार्गावर सकाळ सायंकाळ वाहतूककोंडीला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. शीव पनवेल महामार्गावरील टोलनाक्यापुढील कामोठेपर्यंत मार्गावर अनेक उड्डाणपुल आहेत.यातील काही उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही उड्डाणपुल एमएसआरडीसीकडे आहेत.सुरवातीला महामार्गावरील ६८ कोटींच्या कामात डांबरीकरणाचा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले होते.उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला पहिला एक्सपान्स जोडणीपर्यंत ३० ते ४० मीटरपर्यंत काम करण्यात येणार होते.परंतू नंतर संबंधित विभागांच्या पाहणीमध्ये एक्सपान्स जोडणीपर्यंतच्या कामात १००मीटरची वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी कामात वाढ झाली त्यामुळे जवळजवळ १५ कोटींची वाढ होऊन हे काम ७७ कोटींवर गेले.तर कामोठे उड्डाणपुलाजवळच्या कामासाठी टीआयपीएलला दिलेल्या ९ कोटींच्या निविदेच्या कामात १८ कोटींची वाढ झाली.
त्यामुळे संबंधित ठेकेदारांना डिसेंबर २०१९ पर्यंत काम पूर्णत्वाची कालावधी असला तरी पावसाचा वाढलेला कालावधी यामुळे हे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. वाढ झालेल्या कामांमध्ये टोलनाक्यापुढील वाशी गावाजवळ पुण्याच्या दिशेने मूळ असलेला ३ पदरी रस्त्यात वाढवून तो पाच पदरी करण्यात आला आहे.
कॉंक्रिटीकरणाच्या कामामधील बहुतांश काम पावसाळ्याच्या आधी करण्यात आले होते.आता उर्वरीत कामाला सुरवात झाली असून या मार्गावरील सर्व मिळून उर्वरीत १ किमीचे कॉंक्रिटीकरणाचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
– किशोर पाटील,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग