नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये युती करायची किंवा नाही ते आम्ही पाहून घेऊ. तुम्ही त्याचा विचार करायची गरज नाही. नवी मुंबईत सत्ता आणायची हे आनंद दिघे साहेबांचे स्वप्न होते. त्यांना येथील महापालिकेवर भगवा पहायचा होता. साहेबांचे स्वप्न पुर्ण करायच्या तयारीला लागा. लोकांचे प्रश्न मांडा, ते सोडवायचे प्रयत्न करा. आपण केलेल्या कामांचा आराखडा त्यांच्यापुढे ठेवा. तुम्ही मेहनत घ्या…बाकी मी पाहून घेतो, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री उशीरा नवी मुंबईत प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जीव फुंकण्याचा प्रयत्न केला. अंकुश कदम यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर वाशीतील फाॅर्च्युन या पंचतारांकित हाॅटेलमध्ये त्यांनी घेतलेल्या बैठकीत त्यांनी सर्वांनी दसरा मेळाव्याच्या तयारीला लागा असे आवाहनही केले.
ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई ठरले आहे. राज्य मंत्री मंडळात समावेश झाल्यापासून भाजप नेते गणेश नाईक अधिक आक्रमक बनले असून ठाणे, पालघर येथील वेगवेगळ्या बैठकांमध्ये ते एकनाथ शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे टिकेचे आसूड ओढताना दिसतात. मध्यंतरी ठाण्यातील पक्षीय बैठकीत त्यांनी ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करायला तयार रहा असे आवाहन उपस्थितांना केले. त्यामुळे शिंदे आणि नाईक यांच्यातील संघर्ष अधिकच वाढला आहे. शनिवारी वाशी येथील एका आढावा बैठकीत गणेश नाईक समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढताना महापालिका आयुक्तांवरही टिका केली. हा संघर्ष ताजा असताना शनिवारी सायंकाळी एका प्रक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी वाशीत आलेले एकनाथ शिंदे यांनी विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोहळ्यात महायुतीच्या विजयाचे आवाहन केले खरे, मात्र त्यानंतर फॅाच्युन हाॅटेलमध्ये घेतलेल्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मात्र ‘नवी मुंबईवर भगवा फडकवा, आनंद दिघे साहेबांचे स्वप्न साकार करा’ असे वक्तव्य केल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकांमध्ये शिंदे यांनी केलेल्या सुचक वक्तव्याची चर्चा आता सुरु आहे.
काय म्हणाले शिंदे….
मी मुख्यमंत्री असताना नवी मुंबईसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. येथील सिडको वसाहतीमध्ये रहाणाऱ्या रहिवाशांना दिलासा देताना इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रश्न सोडविला, गावठाणांमधील गरजेपोटी झालेले बांधकाम नियमीत करण्याचा निर्णय घेतला, सिडको वसाहतींमध्ये सुविधा देण्याचा निर्णय घेतला तसेच माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्नही मी हाती घेतला. याशिवाय शहराला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी अनेक महत्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प या शहरात मी हाती घेतले. आपण केलेल्या कामांची माहिती नवी मुंबईकरांपर्यत जाऊ द्या. आपण तळागाळात जाऊन काम करतो, सामान्यांच्या प्रश्नांसाठी जागरुक असतो, वेगवेगळ्या समाज घटकांसाठी सतत काम करतो, हे नवी मुंबईकरांना पटवून द्या. एक लक्षात ठेवा. आनंद दिघे साहेबांचे एक स्वप्न होते. नवी मुंबईत भगवा फडकावयचे. या निवडणुकीत महायुती होईल की नाही ते सर्व आम्ही ठरवू. त्याचा विचार तुम्ही करु नका. तुमचे काम मेहनत घ्यायचे आहे. आनंद दिघे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याचे आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मी स्वत: तुमच्यासोबत असेन …
लोकसभा निवडणुक सुरु होती तेव्हा काही मतदारसंघात आपले उमेदवार पराभव होतील असे बोलले जात होते. मी स्वत: त्या मतदारसंघांमध्ये फिरलो. अशक्य वाटतील अशा जागा जिंकून आणल्या. नवी मुंबईची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्यासोबत आहे. निवडणुका कशा लढवायच्या याची कल्पना आपल्याला आहे. तुम्ही प्रभागांमध्ये काम करा. मतदार यादीकडे लक्ष ठेवा. नवी मतदार यादी येईल त्याचा बारकाईने अभ्यास करा. बाकी निवडणुकांचे माझ्यावर सोपवा, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.