नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये केलेल्या धाडसी व खडतर सेवेसाठी “विशेष पोलीस सेवा पदक” जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील एकूण ६१७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड या पदकासाठी झाली असून, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
गुन्हे अन्वेषण विभागाचे (क्राइम ब्रॅंच) सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे आणि सीबीडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी नक्षलग्रस्त भागात कार्य करताना दाखविलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार आणि कळंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अभय काळे यांचीही याच पदकासाठी निवड झाली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागात कार्य करताना दाखविलेल्या तत्परतेसाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
राज्य पोलीस महासंचालकांनी आदेशात नमूद केले आहे की, पदक उपलब्ध झाल्यानंतर संबंधित विभाग प्रमुख व घटक प्रमुखांनी अधिकृत समारंभ आयोजित करून अधिकाऱ्यांना पदक प्रदान करावे.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या घोषणा झाल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात या पाचही अधिकाऱ्यांना सन्मानित करण्याची शक्यता आहे. या सन्मानामुळे नवी मुंबई पोलीस दलाचा गौरव वाढला असून, नक्षलग्रस्त भागातील कर्तव्यपरायणतेचा हा योग्य गौरव असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.