नवी मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात वावरता यावे यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांमार्फत वेगवेगळ्या योजनांची आखणी केली जात असली तरी वाशीसारख्या शहरातील महत्वाच्या उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी तसेच मोबाईल चोरांचा उपद्रव वाढला आहे. नवी मुंबईचे व्यावसायिक केंद्र असलेला वाशी सेक्टर १७ येथील परिसर तसेच सागर विहार, मिनी-सीशोअर सारख्या परिसरात पायी चालणाऱ्यांना वेगाने येणारे दुचाकीस्वार लक्ष्य करू लागले असून अशा घटना सातत्याने घडत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

वाशी उपनगर हे नवी मुंबईचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सिडकोने उभारलेल्या जुन्या वस्त्या तसेच मोठी व्यावसायिक संकुले या उपनगरात आहेत. वाशी सेक्टर १७ हा संपूर्ण परिसर आजही नवी मुंबईचे मुख्य व्यावसायिक केंद्र म्हणून परिचीत आहे. या परिसरात सकाळ, सायंकाळी मुख्य रस्त्यांच्या बाजूने पायी रपेट मारणाऱ्यांची संख्याही कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून मात्र रात्री नऊनंतर शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या रहिवाशांना या भागात दुचाकीवरुन येणारे चोरटे लक्ष्य करू लागल्याने येथील रहिवाशी धास्तावले आहेत.

याच भागात सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रचना वसाहतीसमोरील रस्त्याच्या कडेना चालणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाच्या हातामधील मोबाइल खेचून दुचाकीस्वारांनी धूम ठोकल्याने हा प्रकार येथे चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका ४० वर्षीय महिलेच्या हातावर ब्लेडने वार करुन आयफोन चोरल्याची घटना घडली होती.

वाशीतील मीनी सीशोअर, सागर विहार या परिसरात सकाळ-सायंकाळ आणि रात्रीच्या वेळेतही व्यायाम, चालण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांची संख्या मोठी आहे. मिनी सीशोअरच्या जाॅगिंग ट्रॅकचा परिसरात सायंकाळच्या वेळेत प्रेमी युगलांच्या अश्लील चाळ्यांमुळे पादचारी हैराण झाले आहेत. मुंबई आणि वाशीच्या सिमेवर असलेल्या मानखुर्द, गोवंडी भागातील युगुलांचा याठिकाणी मोठया प्रमाणावर भरणा असतो. वाशी पोलीस यासंबंधीच्या तक्रारींची दखल घेत नाहीत असा नागरिकांचा अनुभव आहे. मात्र या भागातून मीनी सिशोअर परिसरात येणारे काही दुचाकीस्वार नियमांची एैशीतैशी करत वेगाने दुचाकींची रपेट करत असल्यामुळे पादचारी धास्तावले आहेत.

विशेष पथके तरीही…

सोनसाखळी चोऱ्या, मोबाईल हिसकावणे तसेच घरफोड्या यासारख्या सर्वसामान्यांना हानी पोहचविणारे गुन्हे वाढीस लागल्याने नवी मुंबई पोलिसांनी खास या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी वाशीसारख्या उपनगरांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या चोरांची दहशत वाढू लागल्याने स्थानिक पोलिसांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

वाशी परिसरातील साखळी चोरी, गाड्यांचा काचा फोडून चोरी, मोबाईल हिसकावून पळून जाणे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष उपायोजना करण्यात येत आहेत. यात गस्त पोलीस, साध्या वेशातील पोलीस गस्त, गुन्हा घडल्याचे कळताच तात्काळ घटनास्थळ गाठणे, अभिलेखावरील गुन्हेगारांचा मागोवा घेणे अशा उपायोजना सुरू आहेत. नुकतेच मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात यश आले आहे. – संजय धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी