Navi Mumbai International Airport 2025 Launch: देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. उद्घाटनासाठी अति महत्त्वाचे व्यक्ती (VVIP) आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने, संभाव्य वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा विचार करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जड अवजड वाहनांना १२ तासांची बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे मुलुंड-ऐरोली टोल नाक्यावर आणि नवी मुंबईच्या इतर प्रवेशद्वारांवर अवजड वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळते आहे.

वाहतूक पोलिसांची तयारी अन् जड वाहनांवर बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवारी ८ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर VVIP उपस्थित आहेत. नवी मुंबई, पनवेल, उरण मार्गे विमानतळ परिसरात होणारी वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता, नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने अधिसूचना जारी करण्यात आली होती.

या अधिसूचनेनुसार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास, मार्गस्थ होण्यास आणि वाहने उभी करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. जड अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने तसेच VVIP सुरक्षा व्यवस्थेसाठी हा निर्णय घेण्यात आला.

मुलुंड-ऐरोली टोल नाक्यावर रांगा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाजवळच उरण येथील आंतरराष्ट्रीय जेएनपीटी बंदर असल्याने, या परिसरात जड अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच मोठी असते. वाहतूक बंदी लागू झाल्यामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने नवी मुंबईत प्रवेश करू पाहणारी शेकडो जड वाहने मुलुंड-ऐरोली टोल नाक्यावर अडवण्यात आली. परिणामी टोल नाक्याच्या प्रवेशद्वारावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची पथके याठिकाणी तैनात करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्यांची मोठी कसरत सुरू आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने (उदा. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शासकीय वाहने, प्रवासी बसेस) तसेच कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळता इतर सर्व जड वाहतूक थांबवण्यात आल्याने मालवाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला आहे. या अवजड वाहनांना रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही वाहने इथेच थांबवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी तैनात राहून वाहनचालकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचा सल्ला दिला आहे. संध्याकाळपर्यंत वाहतुकीची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर हळूहळू अवजड वाहनांना मार्गस्थ करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.