पनवेल – नवी मुंबईतील सेक्टर ३१ येथे २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रोलिंग लाऊड इंडिया हिपहॉप म्युझिक फेस्टिव्हल दरम्यान प्रेक्षकांसाठी मद्यविक्रीचे स्टॉल लावण्याची आयोजकांनी मागणी केली असून, यावर अंतिम निर्णय न झाल्याने कार्यक्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दररोज सुमारे २५ हजार प्रेक्षक अपेक्षित असलेल्या या महोत्सवासाठी मद्यविक्रीची परवानगी देण्यात येणार का, याबाबत स्थानिक स्तरावर जोरदार चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे, मंगळवारी म्हणजे कार्यक्रमाच्या अवघ्या चार दिवस अगोदर आयोजकांनी मद्यविक्रीची स्टॉल उभारणीसाठीचा अर्ज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रायगड अधीक्षकांकडे सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
यापूर्वी खारघर परिसरात मद्यविक्रीला स्थानिक नागरिकांच्या एका गटाचा तिव्र विरोध असल्याने या विरोधाला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे सुद्धा पाठबळ मिळाले होते. फक्त दोन दिवसांसाठी तात्पुरत्या मद्यविक्रीची परवानगीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग काय निर्णय घेणार का, हे सर्वसामान्य खारघरवासिय लक्ष्य ठेऊन आहे. या फेस्टिव्हलसाठी सिडकोने जागेची परवानगी दिली आहे. मात्र पनवेल महापालिकेकडे सादर केलेल्या अर्जात आयोजकांनी आवश्यक परवानग्यांची माहिती न दिल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत महापालिकेने कार्यक्रमास परवानगीची कोणतीही प्रक्रिया अंतिम केली नव्हती. आयोजकांनी या कार्यक्रमासाठी विविध विभागांचे ना हरकत दाखले आणले नाहीत म्हणून ही प्रक्रिया थांबल्याचे येथील अधिका-यांनी सांगीतले. आयोजकांनी नवी मुंबई पोलीस विभागाकडे मागीतलेल्या पोलीस बंदोबस्ताची विनंती केली असून कार्यक्रम दुपारी २ ते रात्री १० या वेळेत पार पडणार आहे.
हा सांगितिक महोत्सव जगातील सर्वात मोठ्या हिपहॉप सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या कार्यक्रमांत कलाकारांमध्ये विझ खलिफा, डॉन टोलिव्हर (अमेरिका), सेंट्रल सी (यूके), तसेच करण औजला, दिव्य आणि हनुमानजाती (भारत) यांच्या सहभागाची घोषणा करण्यात आली आहे.स्थानिक नागरिकांकडून मद्यविक्रीविरोधात नाराजी व्यक्त होत असून सरकारी सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा फेस्टिव्हल मद्यविक्रीविना होणार की अंतिम क्षणी परवानगी मिळणार यावर खारघरमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
