नवी मुंबई : सोमवारी कांदा बटाटा बाजारातील प्रशासकीय इमारतीतील खुद्द एपीएमसी सचिवांच्या दालनातील छताचा भाग कोसळला होता. त्या अनुषंगाने आता महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून बुधवारी महानगरपालिकेने एपीएमसी मधील धोकादाय इमारतीतील नळ जोडणी खंडित केली आहे. कांदा बटाटा बाजार, प्रशासकीय इमारत, मॅफको मार्केट आणि मसाला बाजार येथील नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. अती धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ऍक्शन घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातून ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : सिडको मंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती

गेल्या कित्येक वर्षांपासून अतीधोकादायक असलेल्या कांदा बटाटा, मसाला व मॅफको मार्केटमध्ये वारंवार स्लॅप कोसळल्याच्या घटना या पूर्वी घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच प्रशासकीय इमारतीतील सचिव पी. एल. खंडागळे यांच्या खुर्चीवर स्लॅप कोसळला होता. मागील वर्षी कांदा बटाटा बाजारातील लिलागृहाची कमानी तसेच काही गाळ्यातील सज्जा भाग कोसळले होते. गेली अनेक वर्षे या मार्केटमधील धोकादायक इमारतीतील गाळे धारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटिस पाठवण्यात येत आहे. मात्र तरीदेखील तेथे व्यावसायिक व्यापार सुरूच आहे. त्यामुळे आता पावसाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजार, मसाला बाजार आणि मॅफको मार्केटसह मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीतील नळ जोडणी खंडित केल्याचे समोर आले आहे.