नवी मुंबई : बदलापूर येथील घटना ताजी असताना नवी मुंबईतही विविध प्रकरणांत अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, बलात्कार, विनयभंगप्रकरणी दोन दिवसांत चार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय गायकवाड असे यातील आरोपीचे नाव आहे. एक दहावर्षीय विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी एका दुकानात गेली होती. शाळेत त्यांना प्रोजेक्ट बनवण्यासाठी कार्ड बोर्ड पेपर हवा होता. त्यासाठी त्या दोघी दुकानात गेल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांना अडवून शरीरावर विचित्र पद्धतीने स्पर्श केला. त्यामुळे दोघींच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. याबाबत त्यांनी पालकांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनीही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा २० तारखेला नोंद झाला.

हे ही वाचा… ‘लाडक्या उद्योगपती’विरोधात नवी मुंबईकरांचा संताप; ‘सिडको’च्या बैठकीला सामाजिक, राजकीय क्षेत्रातून विरोध

शहरात राहणाऱ्या एक १५ वर्षीय युवतीचा पाठलाग आरोपी सागर माथने हा करत होता. २० तारखेला त्याने एका शाळेनजीक तिला गाठले. तिच्याशी बळजबरीने लगट केले. तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. पीडितेने स्वत:ची सुटका करून घेत घर गाठले. घडल्या प्रकाराबाबत पालकांना माहिती देताच त्यांनी आरोपी सागर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलमान्वये बुधवारी गुन्हा नोंद केला आहे.

नवी मुंबईतच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या फुलचंद कुमार याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीचे पूर्ण नाव अद्याप समोर आले नाही.आरोपीने अल्पवयीन पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गरोदर झाली आहे. हा प्रकार समोर आल्यावर पालकांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारणा केली असता सर्व प्रकार समोर आला. याबाबत पालकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा… वाढवण बंदर देशातील सर्वोत्तम बंदर बनणार; केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील परिमंडळ दोन येथेही बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपीचे नाव तारेख गाझी असे आहे.

आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन तिला हाक मारत जोरजोरात ओरडून तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. ‘मी तुला पळवून नेणार असून मला फक्त तू हवी आहेस’, असे म्हणत होता. आरडाओरडा ऐकून पीडित अल्पवयीन मुलगी व तिचे पालक घराबाहेर आले असता जमलेल्या लोकांसमोर पीडितेचा हात पकडून ओढत होता. त्यामुळे पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. घडल्या प्रकाराची माहिती तिच्या पालकांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनीही तात्काळ आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सार्वजनिक जागेवर आरडाओरडा करत शांतता भंग करणे कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai for four registered under pocso in last two days asj