नवी मुंबई : नवी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या चळवळीला आता अधिक बळ मिळाले असून, ‘वृक्ष गजानन’ या संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मूळतः पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन गावात काही वर्षांपूर्वी एका स्थानिक उपक्रमातून उगम पावलेल्या या संकल्पनेचा विस्तार हळूहळू पुणे-मुंबई-नवी मुंबईपासून ते थेट परदेशापर्यंत झाला आहे. शुद्ध शेतीमातीपासून मूर्ती तयार करून त्यात औषधी व फुलांच्या बिया रोवून, विसर्जनानंतर त्यातून रोप उगवण्याची ही कल्पना महाराष्ट्रात आपली मुळं रोवत असून पर्यावरण पूरक मूर्तींच्या संकल्पनेला अधिक बळकटी देत आहे.
लॉकडाऊन काळात घरगुती गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पर्याय शोधला जात असतानाच ‘वृक्ष गजानन’ या संकल्पनेला मुंबई-पुण्यासह नवी मुंबईत अधिक गती मिळाली. यंदा नवी मुंबईत सुमारे २०० ते २५० वृक्ष गणेशमूर्ती विक्रीसाठी तयार करण्यात आल्या असून, नागरिकांचा या संकल्पनेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मूर्ती विक्रेते सांगत आहेत.
शाळा, सोसायट्या, महिला मंडळे तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक यंदा मोठ्या संख्येने या पर्यायाकडे वळत आहेत. लहान मुलांमध्ये निसर्गाविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरत असल्याने पालकही ती आवर्जून स्वीकारत आहेत. समाज माध्यमातही ‘वृक्ष गजानन’बाबत मोठी चर्चा सुरू आहे.
संकल्पना काय?
या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शेतीच्या मातीतून मूर्ती बनवणे इतकेच नसून, याला देण्यात येणारा रंगही पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक आहे. यासोबतच या मूर्तींमध्ये तुळस, झेंडू, गुलाब, सूर्यफूल यांसारख्या फुलांच्या बिया ठेवण्यात येतात. या मूर्तींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने पाण्यात न करता घरातील किंवा अंगणातील जमिनीत किंवा कुंडीत केले जाते. विसर्जनानंतर मूर्ती ज्यूटच्या कुंडीत ठेवून त्यात पाणी घालण्यात येते आणि ती मूर्ती नैसर्गिकरित्या विरघळते. काही दिवसांतच त्यातून नवीन रोप अंकुरते, आणि त्यातून भक्ती, निसर्गप्रेम व जबाबदारी यांची त्रिसंधी साधली जाते.
लॉकडाऊन काळात पर्यावरण पूरक गणेशमूर्तींचा पर्याय शोधत असताना आम्हाला ही कल्पना सुचली, त्यानंतर अवघ्या ७-८ मूर्तींपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता विस्तारला असून यावर्षी विक्री सुरू होऊन केवळ आठवडा उलटला असला तरी आतापर्यंत २०० ते २५० गणेश भक्तांनी वृक्ष गजाननची मागणी केली आहे. – स्नेहल काशीद, विक्रेते, वृक्ष गजानन, नवी मुंबई</strong>
‘विसर्जनाविना भक्ती’ ही नवकल्पना अनेकांच्या मनाला भावली आहे. काही ठिकाणी सामूहिकरित्या ‘वृक्ष गजानना’ची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नवा आदर्श निर्माण केला जात आहे.