पनवेल : हवेतील वायु गुणवत्ता निर्देशांक चढा न राहता धुलीकणाची मात्रा कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी पनवेल महापालिकेला दिलेल्या आदेशानंतर काही तासातच पनवेल शीव महामार्गावरील खारघर टोलनाक्यावर पालिकेने वाहनांवर पाण्याचा मारा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली. पहिल्यांदाच केलेल्या या प्रयोगामध्ये एका तासात साडेतीनशेहून अधिक वाहनांवर हा पाणी मारा शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झाल्याने आता तरी हवेतील प्रदूषण कमी होईल अशी अपेक्षा आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने याबाबतची उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासांत पालिका प्रशासनाने खारघर टोलनाक्यावर पाण्याच्या टाकी व इतर यंत्रणा येथे कार्यान्वित केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सिडकोमध्ये १०० पदांची भरती; मंजूर पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना

पाण्याची टाकी १० हजार लीटरची येथे बसविण्यात आली असून एकावेळी १२ नोझल टोलनाक्यावर सुरू आहेत. तसेच एका टाकीतील पाणी २ तासांत संपल्यानतंर पुन्हा नव्याने टाकी भरली जाते. तासाला ३०० ते ३५० गाड्यांवर हा पाणीमारा केला जात असल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली. स्वतः आयुक्तांनी ही यंत्रणा व्यवस्थित चालविली जाते का, याचा आढावा घेतला. यासाठी लागणारे पाणी सध्या पालिका कोपरा तलावातून आणले जात आहे. २४ तास ही यंत्रणा सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी १२ ते १५ टँकर पाणी लागेल असे नियोजन पालिकेने केले आहे. हा पाण्याचा मारा पुढील पाच ते सहा दिवस सुरू राहणार आहे. वाहनांवर पाणी माऱ्याचा प्रयोग पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गावर केला जात आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवरील माती व धूळ कमी होऊन मुंबई शहरातील हवेतील धूलिकण कमी होण्यास मदत होणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In panvel water hitting on vehicles at the kharghar toll plaza at the entrance of mumbai to reduce the air pollution css