पनवेल :  कळंबोली उपनगरातील येथील सेक्टर १ मधील एलआयजी बैठ्या वसाहतीतील ‘राजे शिवाजी रहिवासी संघ’ या गृहनिर्माण सोसायटी परिसरातील नाल्यात शनिवारी दुपारच्या सुमारास एक मृत अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक रहिवाशांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ कळंबोली पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृत अर्भक ताब्यात घेतले असून पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हे अर्भक मुलाचे असल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे अर्भकाची कंबरेखालची बाजू उंदरांनी कुरतडल्याने नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.या संदर्भात कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की, “सदर मृत अर्भक सापडल्याने पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच हे अर्भक कोणाचे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कामाला लागली आहेत.

परिसरातील प्रसूतीगृहे, खासगी दवाखाने तसेच महापालिकेच्या नोंदींची तपासणी करून या बाळाच्या मातेचा शोध घेतला जाणार आहे.”दरम्यान, यापूर्वीही कळंबोलीतील महात्मा गांधी मिशन रुग्णालयाशेजारील कचराकुंडीत अशाच प्रकारचे अर्भक सापडले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध घेण्यात यश मिळवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांत संताप व दु:खाची भावना व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून परिसरात सीसीटीव्ही फूटेजच्या आधारेही तपासाचा धागा शोधला जात आहे.सध्या पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णलायात अर्भकाच्या शवाचे विच्छेदन सोमवारी होणार आहे. त्यानंतर या अर्भक किती तासांपूर्वी जन्म झाला याची व इतर माहिती मिळू शकेल.