पनवेल : पनवेलजवळील कळंबोली उपनगर मंगळवारी (ता.११) रात्री अचानक ज्वलनशील दर्प आणि धूरक्याच्या चादरीखाली गुदमरत राहिले. रात्री दहा वाजल्यापासून या भागात नाकाला झोंबणारा दर्प आणि धुरकट वातावरणामुळे नागरिकांनी अक्षरशः श्वास रोखून शतपावली केली. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बसविले आहे. मात्र, या मंगळवारी नागरिकांनी त्या यंत्राजवळ जाऊन पाहणी केल्यावर, यंत्राचा काटा ‘हवा चांगली’ असल्याचेच दाखवत होता.

प्रत्यक्षात मात्र स्वता यंत्र धूरक्यात असले तरी हवा आणि दृष्यमानता चांगली कशी असा प्रश्न या परिसरातून पायी चालणा-यांना पडला होता. परिसरात तीव्र दर्प आणि धूराचे वातावरण पसरलेले होते. शहरातील जागरूक नागरिक नितिन निकम यांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला, त्यानंतर हा विषय चर्चेत आला.या घटनेची गंभीर दखल घेत पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी संबंधित विभागांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय भोसले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या तापमानातील मोठ्या फरकामुळे आणि कॉंक्रीटच्या वाढत्या जंगलांमुळे वातावरणात प्रदूषणकण स्थिरावले आहेत. रस्त्यांवरील धूळ, घाण, आणि पाण्याचे अंश यांच्या मिश्रणामुळे धूरके पसरल्याचे दिसून येते. तज्ज्ञांनी महापालिकेला नियमित पाण्याने रस्ते धुणे आणि झाडांवरील धूळ धुण्यासाठी यंत्रांचा वापर वाढविण्याचा सल्ला दिला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेनंतर स्थापन झालेल्या पर्यावरण समितीनेही याचप्रकारच्या उपाययोजनांची शिफारस केली होती. तरीदेखील कळंबोलीसारख्या उपनगरात अशा घटना घडणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे निदर्शक ठरत आहे.