नवी मुंबई : सिडको महामंडळाने चार महिन्यांपूर्वी २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला सुरूवात केली. मात्र अजूनही सोडत प्रक्रिया पूर्ण झाली नाही. सिडकोच्या घरांच्या किमती महाग असल्याने अनेक अर्जदारांनी सिडकोची सोडत जाहीर होण्यापूर्वीच सिडकोला ई-मेलद्वारे ते माघार घेत असल्याचे कळविले आहे. संबंधित महाग घरांचे सिडको मंडळाला पाठविलेले संदेश अर्जदारांनी ह्यलोकसत्ताह्नला सुद्धा पाठविले आहेत. याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभाग आणि काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला मात्र अधिकारी वर्गाने प्रतिसाद दिला नाही. सोडतीला वारंवार मुदतवाढ देऊन अखेर सिडकोने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सोडत प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केल्याने २१ हजार अर्जदारांचे लक्ष सोडतीकडे लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडकोने १२ ऑक्टोबरला ‘माझे पसंतीचे माझे घर’ या २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला सुरूवात केली. यावेळी पहिल्यांदाच सिडको मंडळाने घर विक्रीसाठी ७०० कोटी रुपये देऊन कंत्राटदार नेमला आहे. या कंत्राटदाराला घरविक्रीपूर्वी आणि निवडणूक काळापूर्वीच १०४ कोटी सिडकोने दिले. या कंत्राटदाराने सिडकोची २६ हजार घरांच्या विक्रीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसले नाही. सिडकोने घर विक्रीसाठी नवीन कंत्राटदार नेमला त्याचसोबत या सोडतीमध्ये अटीशर्तीमध्ये सुद्धा बदल केला. अर्जदारांना घरांच्या किमती उशीराने कळवल्या. तसेच किमती जाहीर करण्यापूर्वीच अर्जदारांकडून त्यांची कागदपत्रे जमा करुन घेतली. यामध्ये अर्जदाराची संपूर्ण माहिती तसेच अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर पुरावे अशा कागदपत्रांचा समावेश होता. ही कागदपत्रे जमा करताना अनेकांना हजारोंची पदरमोड आणि वेळ घालवावा लागला. त्यामुळे या सोडतीला सुरुवातीलाच प्रतिसाद कमी मिळला.

२६ हजार घरांसाठी सोडत प्रक्रियेमध्ये १ लाख ६० हजार अर्जदारांनी नाव नोंदणी केली. अर्जनोंदणीसाठी अडीचशे रुपये अर्जदारांना भरायचे होते. मात्र सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्यावर १ साख ६० हजार पैकी एक लाख अर्जदारांनी अर्जशुल्क न भरता पहिल्यांदा सोडत प्रक्रियेतून माघार घेतली. आणि उर्वरीत ६० हजार अर्जदारांनी अडीचशे रुपये सिडकोकडे जमा केले. तळोजातील घरांची किमत २५ लाख तर खारघरचे घर एक कोटी सात लाख आणि आणि वाशी येथील घर ७९ लाख रुपयांना असल्याने अर्जदारांचा हिरमोड झाला. त्यामुळे ६० हजार पैकी ३८ हजार ६५० जणांनी पुन्हा सोडत प्रक्रियेतून माघार घेण्याचे पाऊल उचलले. अनामत न भरता या प्रक्रियेतून हे अर्जदार बाहेर पडले. त्यामुळे शेवटच्या टप्यात २१ हजार ३५० अर्जदार या सोडत प्रक्रियेमध्ये उरले. मात्र १५ फेब्रुवारीला होणाऱ्या सोडतीचा मुहूर्त पुढे ढकल्याने पुन्हा अर्जदारांनी सिडकोच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. या दरम्यान अनामत रक्कम भरलेल्या अनेक अर्जदारांनी सिडको मंडळाकडे लेखी इ मेलवरुन संपर्क साधून या सोडत प्रक्रियेतून माघार घेतली. आतापर्यंत किती अर्जदारांनी माघार घेतली याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभागाकडे तसेच पणन विभागाकडे संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

सिडको महामंडळाने ना नफा, ना तोटा या तत्वांवर चांगल्या बांधकाम दर्जाची घरे बांधली आहेत. कोणतेही छुपे दर यामध्ये अर्जदारांकडून घेतले नाहीत. इमारतीच्या महागृहनिर्माणातील परिसर प्रशस्त आहे. त्यामध्ये सुविधा सुद्धा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळेच २१ हजार ४०० अर्जदारांनी ‘माझे पसंतीचे माझे घर’ या योजनेला पसंती दर्शवून सिडकोच्या सोडतीला पोचपावती दिली आहे. या घरांचे बाजारभावापेक्षा कमी दर असल्याने त्याला महाग घरे म्हणता येणार नाही. विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many applicants withdraw name from cidco housing draw due to expensive home zws