पनवेल : सिडको महामंडळाने फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील विविध नोडमध्ये २६ हजार घरांच्या सोडतीमध्ये उपलब्ध केलेल्या घरांच्या किमतीपेक्षा नवी मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती कमी असल्याने सध्या म्हाडा योजनेतून नवी मुंबईतील घर मिळविण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित असणाऱ्या कोकण म्हाडाने १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना तसेच ५० टक्के परवडणाऱ्या योजना यामधून ५३६२ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. यामध्ये नवी मुंबईत दिघा, नेरूळ, सानपाडा, घणसोली येथील सात विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील सुमारे २०५ घरांच्या विक्रीचा समावेश आहे. या योजनेची अर्जस्विकृती १४ जूलै रोजी सुरू झाली. १३ ऑगस्ट ही ऑनलाइन अर्ज नोंदणींची अंतिम तारीख आहे.
म्हाडाच्या सोडतीमध्ये नवी मुंबईतील सानपाडा येथील २९० चौरस फुटांचे घर अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना १४ लाख ४२ हजारांना मिळू शकणार आहे. तसेच नेरुळ येथील ५४० चौरस फुटांचे घर ३० लाखांना सोडतीमध्ये उपलब्ध आहे. सिडकोने फेब्रवारी महिन्यात जाहीर केलेल्या योजनेमध्ये ५४० चौरस फुटांचे खारघर स्थानकाजवळील घर ९७ लाखांना विक्रीसाठी उपलब्ध होते. तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनल येथील ३२२ चौरस फुटांचे घर ७४ लाखांना विक्रीस उपलब्ध होते. विशेष म्हणजे सिडकोने परवडणारी घरे या योजनेतून पंतप्रधान आवास योजनेतून ही घरविक्री केली होती. सिडकोची घरे महाग असल्याने हजारो नागरिकांनी सोडतीमध्ये घरे लागूनही ती न परवडत असल्याने या योजनेतून काढता पाय घेतला होता.
सिडकोने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जागेची किंमत तसेच बांधकाम खर्च याचा ताळमेळ घालूनच या योजनेतील घरांच्या किमती ठरवल्या होत्या. मात्र सरकारच्या महामंडळाकडून विक्री होत असलेल्या घरांच्या किमती हा परवडणाऱ्या आणि एकाच धोरणानुसार ठरवल्या जाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.