Navi Mumbai International Airport 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पार पडलं आहे. खरं तर मुंबई महानगरातील दुसरं मोठं हे विमानतळ आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केलं.
नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसत असल्याचं म्हणत मोदींनी स्वस्तात विमान प्रवासाचा मुद्दा मांडत २०१४ सालच्या त्यांच्याच विधानाचा उल्लेख केला. ‘हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई प्रवास करता यायला हवा’, असं मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महाराष्ट्राचे शेतकरी युरोप आणि बाहेरच्या देशांबरोबर देखील जोडले जातील. या विमानतळामुळे नवे उद्योग येतील, या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. जेव्हा आपल्या स्वप्नाला सिद्ध करण्याचा संकल्प असतो, जेव्हा देशवाशियांपर्यंत विकास पोहोचवण्याची इच्छा शक्ती असते तेव्हा मार्ग देखील निघतो. आपली हवाई सेवा याचं एक उदाहरण आहे”, असं मोदींनी म्हटलं.
‘हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई प्रवास करता यावा’
“२०१४ मध्ये जेव्हा जनतेने मला संधी दिली तेव्हा मी म्हटलं होतं की, हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई प्रवास करता यायला हवा. या स्वप्नाला पूर्ण करणं खूप गरजेचं होतं की देशात नवीन-नवीन विमानतळ बनवले जावेत. आमच्या सरकारने यावर काम सुरू केलं. २०१४ पर्यंत आपल्या देशात फक्त ७४ विमानतळ होते, पण आज भारतातील एकूण विमानतळांची संख्या १६० च्या पुढे गेली आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.
‘स्वस्तात विमानाचं तिकिट मिळू शकेल…’
“जेव्हा देशातील छोट्या-छोट्या शहरांत विमानतळ होतात तेव्हा हवाई प्रवासाठी विकल्प मिळतो. त्यासाठी देखील पैशाच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही उडाण योजना सुरू केली, कारण स्वस्तात लोकांना विमानाचं तिकिट मिळू शकेल. उडाण योजनेच्या माध्यमातून लोकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत”, असंही मोदी म्हणाले आहेत.
#WATCH | At the inauguration event of Navi Mumbai International Airport, PM Modi says, "…Today, the entire nation is working towards 'Viksit Bharat'. A Viksit Bharat is one where there is both momentum and progress, and where public welfare is paramount and government schemes… pic.twitter.com/6Axg0ykbI1
— ANI (@ANI) October 8, 2025
‘विकसित भारताची झलक दिसते…’
“आज दि. बा. पाटील यांचं कार्य देखील आठवतं. दि. बा. पाटील यांचं कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचं संपूर्ण जीवन प्रेरणा देतं. तसेच आपण आज मागच्या १२ वर्षांत वळून पाहिलं तर अनेक मोठमोठी कामे झाले आहेत. नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित आहे. या विमानतळाचा आकार कमळाच्या फुलाप्रमाणे आहे, याचा अर्थ हे संस्कृती आणि समृद्धीचं एक प्रतिक आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.