नवी मुंबई: नवी मुंबईतील बेलापूर येथील खाडीत अंदाज न आल्याने एक दुचाकी स्वार थेट खाडीच्या पाण्यात दुचाकीसह गेला. हि घटना सकाळी साडे सहाच्या आसपास घडली आहे. यात अग्निशमन दलाने दुचाकी वर मागे बसलेल्या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळवले आहे. मात्र दुचाकी चालवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. दुचाकी पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.
नवी मुंबईतील बेलापूर येथे असणाऱ्या खाडीत अंदाज न आल्याने दुचाकी पाण्यात गेली. हि माहिती मिळताच सीबीडी पोलीस आणि सीबीडी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यात दुचाकी चालवणारा अर्थव शेळके (वय २९ ) याचा शोध घेण्यात येत आहे तर दुचाकी वर मागे बसलेला श्रेयस जोग (वय २३) याला वाचवण्यात यश आले आहे. रेस्क्यू टीम ने दुचाकी बाहेर काढली आहे. याबाबत सकाळी पावणेसात वाजता अग्निशमन दलास कॉल आल्यावर ते तात्काळ घटनास्थळी रवाना झाले होते.
बेलापूर जेट्टीचा हा परिसर ध्रुवतारा म्हणून ओळखला जातो. बेलापूर जेट्टीत दोनच महिन्यापूर्वी असाच अपघात झाला होता. गुगल मॅप चे मार्गदर्शन घेत ऑडी चालवणारी एका महिलेस उड्डाणपूल आणि त्याच्या शेजारी जेट्टी कडे जाणारा मार्ग यात गफलत झाल्याने तिने ऑडी थेट खाडीत घातली. यात सुदैवाने तिला वाचवण्यात यश आले होते. या ठिकाणी एका बाजूला उरण कडे जाणारा खाडी उड्डाणपूल आहे तर उड्डाणपुलाच्या शेजारी असणारा रस्ता हा थेट खाडीत जातो. त्यामुळेच गुगल मॅप वर गाडी चालक फसतात. अशा घटना रात्री अंधार असताना होण्याची जास्त भीती असते. अशाच प्रकारे दोन महिन्यापूर्वी ऑडीचा अपघात झाला होता.
या ठिकाणी असे अपघात होऊ नये यासाठी संरक्षक आली अथवा भिंत बांधण्यात यावी . किमान रात्रीच्या वेळी लाईट्स दिशादर्शक रेडियम लावण्यात यावे अशी मागणी अनेक महिन्यापासून केली जात आहे. मात्र त्याकडे संबंधित प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप नेहमी होत असतो.
आजची घटना गंभीर असून आता तरी त्याची दखल घेत योग्य ती कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.