Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन बुधवारी (८ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळाने असंख्य प्रवाशांना फायदा पोहचणार आहे. या विमानतळावर लांब पल्ल्यासाठीच्या रुंद विमानांसह अधिक विमानांसाठी जास्तीचे स्लॉट तयार करण्यात आले आहेत. या विमानतळामुळे  ईशान्य मुंबईतील आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चांगली सोय होणार आहे, कारण ईशान्य मुंबईतील आणि पुण्यातील प्रवाशांना हे विमानतळ अधिक जवळ असेल. तसेच यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण देखील कमी होईल.

७ शहारांमधून कनेक्टिंह फ्लाइट्स

लवकरच अहमदाबाद, सूरत आणि हैदराबाद सारख्या दक्षिण आणि पश्चिम भारतातील किमान सात शहरांतून मुंबईतील एनएमआयए किंवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (सीएसएमआयए) कनेक्टिंग आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेऊ शकतील. तसेच प्रवासी पहिल्या विमानतळावरच इमिग्रेशनची प्रक्रिया पार पाडू शकतील. यामुळे प्रवाशांना मुंबईला येता येईल, येथे सेक्युरिटी क्लिअर करता येईल आणि पुढील विमानात बसता येईल. ज्यामुळे सध्या दुबई, दोह, अबू धाबी किंवा सिंगापूरच्या चांगीमध्ये अस्तित्वात असलेले ‘स्मूथ ट्रान्झिशन’ प्रवाशांना अनुभवता येईल.

नवी मुंबई एअरपोर्ट हा एक क्रांतिकारी बदल ठरणार आहे कारण मुंबईतील विमानतळ अनेक वर्षांपासून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत आला आहे. मुंबई महानगर परिसरात प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. मुंबईत दोन विमानतळ झाल्याने त्याचा जगाशी संपर्क वाढणार आहे. यामुळे जगाचा टियर I आणि टियर III शहरांशी संपर्क वाढणार आहे.

या एअरलाइन्स करणार काम

८ ऑक्टोबरला या विमानतळाचे औपचारिक उद्घाटन होणार असून, त्यानंतर डिसेंबरमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पूर्ण क्षमतेने उड्डाणांसाठी इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले आहे.

एनएमआयए, सीएसएमआयए यामध्ये एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा सारख्या मोठ्या विमान कंपन्यांचे देशांतर्गत नेटवर्क तयार करणार आहेत. या विमान कंपन्या प्रवाशांना इथे घेऊन येतील आणि त्यानंतर ते प्रवासी येथून जगभरातील शहरांमध्ये कनेक्टिंग फ्लाइट्स घेतील. मोदी सरकार एअरलाइन्स इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी काम करत आहे. या अंतर्गत दिल्ली एनसीआर आणि महाराष्ट्रातील एमएमआर या भागांना दुसरे विमानतळ मिळत आहे. हैदराबाद आणि बंगळुरू येथेही मोठा विस्तार केला जात आहे.

एअर इंडिया समूहाने घोषणा केली आहे की ते आपल्या लो कॉस्ट सर्व्हिस कॅरिएअसह एअर इंडिया एक्स्प्रेससह नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) सेवा सुरू करतील. योजनेच्या पहिल्या टप्प्यात, एआय एक्स्प्रेस नवी मुंबईतून दररोज २० विमानांच्या उड्डाणांसह भारतातील १५ हून अधिक शहरांमध्ये व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू करेल. तसेच त्यांची २०२६ च्या मध्यापर्यत दररोज ५५ उड्डाणे सुरू करण्याची योजना आहे, ज्यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय स्टॉप्सचा समावेश असेल.

नवी मुंबई विमानतळावरून ऑक्टोबरच्या अखेरीस तिकिटांची विक्री होणार असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला दररोज सकाळच्या पहिल्या तासांत ८ ते १० विमानांचे उड्डाण त्यानंतर मागणीनुसार २० ते ३० विमानांचे दर तासाला उड्डाण करण्याचे नियोजन केल्याची माहिती सिडको आणि अदानी समूहातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.