नवी मुंबई : रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीतील नात्याची वीण घट्ट करणारा सण. परंतु गेल्या काही वर्षांपासून या सणाला नव्या अर्थाने साजरे करण्याची पर्यावरणपूरक चळवळ सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणजे ‘बीज राखी’ – अशी राखी जी भावाच्या मनगटावर बांधल्यानंतर मातीत पेरल्यास रोपाच्या रूपाने फुलते. नवी मुंबईसारख्या शहरात यंदा या राख्यांना विशेष मागणी असून, त्या तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे महिलांनाही रोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे.

नवी मुंबईत गेल्या तीन वर्षांपासून बीज राखीची अभिनव संकल्पना यशस्वीरित्या राबवली जात आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचाही या उपक्रमाला सक्रिय हातभार लाभला असून, पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. बीज राखी म्हणजे अशी राखी, ज्यामध्ये गुलमोहर, तुळस, सप्तपर्णी, सीताफळ, लिंबू आदींच्या बिया गुंफलेल्या असतात. पारंपरिक राखी सणानंतर जलप्रवाहात किंवा तुळशी वृंदावनात अर्पण केली जाते. प्लास्टिकऐवजी सूत किंवा कापड वापरून तयार होणाऱ्या या राख्या पर्यावरणपूरक तर आहेतच, शिवाय पूर्णतः नैसर्गिकही आहेत.

या बीज राख्यांच्या निर्मितीमध्ये स्थानिक महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था आणि काही शालेय विद्यार्थीही मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत. यातून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. घणसोलीतील ‘प्रभात ट्रस्ट’ या महिला बचत गटाकडून या या बीज राख्या बनवण्यात येत असून, पालिकेच्या बीज संकलन केंद्रातून या संस्थेला बीजांचा पुरवठा केला जातो. माफक दरात, म्हणजेच ५० रुपयांपासून या राख्यांची विक्री केली जात आहे. शाळा, संस्था, कंपन्या आणि मोठ्या ऑर्डर देणाऱ्यांसाठी विशेष सवलतही दिली जात आहे.

तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला हा उपक्रम आता चांगल्या प्रकारे बहरला आहे. सुरुवातीला १-२ महिलांसह सुरू केलेल्या उपक्रमात यंदा १५ महिला सहभागी झाल्या असून यातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास हातभार लागत आहे. यंदा आमच्या संस्थेचे दोन ते अडीच हजार बीज राख्या बनवण्याचे उद्दिष्ट असून, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. – डॉ. अश्लेषा प्रशांत थोरात, अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट

बीज राखी केवळ आठवणी जपत नाही, ती सणानंतर मातीत पेरल्यानंतर रोपाच्या रूपाने नवे जीवन फुलवते आणि पर्यावरणाचा संदेश देते.