नवी मुंबई : अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिला टप्प्यातून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती. विमानतळ टर्मिनलपर्यंत प्रवाशांना थेट पोहचता यावे यासाठी सिडको महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) उत्तम दळणवळणाची सुविधा उभारत असून त्याचे काम अंतिम टप्यात आहे. पुढील काही दिवसांत हा मार्ग विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुला होणार असल्याचे संकेत सिडकोने शुक्रवारी दिले.
विमानतळाला पश्चिमेकडून दळणवळणाची सुविधा प्रदान करण्याकरिता विकसित करण्यात येत असलेल्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सिडकोने स्पष्ट केलेे. यामुळे आम्रमार्ग आणि उलवे सागर किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होईल.
सिडकोतर्फे काही कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अटल सेतू ते विमानतळादरम्यान कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याकरिता उलवे किनारी मार्ग नियोजित आहे. आम्र मार्ग (राष्ट्रीय महामार्ग ३४८ ए) आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत चालावी याकरिता एमजेपीआरसीएलच्या प्रकल्पांतर्गत विमानतळ पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.
पश्चिम प्रवेश आंतरबदल हा उलवे किनारी मार्गाच्या १.२ कि.मी.च्या उन्नत विमानतळ जोड रस्त्याला जोडला आहे. आंतरबदल मार्गावर दोन लूप आणि दोन रॅम्प यांचा समावेश आहे. आम्र मार्गावरून विमानतळाच्या दक्षिण बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता लूप ए व आम्र मार्गावरून विमानतळाच्या उत्तर बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता रॅम्प ए चा वापर करता येणार आहे. लूप बी आणि रॅम्प बीद्वारे विमानतळाकडून आम्र मार्गाच्या अनुक्रमे उत्तर व दक्षिणेकडे जाण्याकरिता पर्याय असणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग प्रकल्पांतर्गत एक अतिरिक्त वाहन निम्नमार्ग आणि उलवे नदी परिवर्तित प्रवाहावरील लहान पूल यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पश्चिम आंतरबदल मार्ग पूर्णत: कार्यान्वित होऊन वाहतुकीकरिता खुला होणे अपेक्षित आहे.
परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभावी याकरिता सिडकोतर्फे अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्य प्रवेशमार्गांची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास थेट जोडणी होणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल आणि पूर्व प्रवेश आंतरबदल हे त्यांपैकी महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून विमानतळाकडे होणारी वाहतूक सुरळीतरीत्या पार पडणार आहे.विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ