नवी मुंबई – सिडको महामंडळात लाचखोरीचे सत्र सुरूच आहे. ऐन गणेशोत्सवात गणेशमूर्ती कारांकडून लाच स्विकारण्याची घटणा ताजी असताना ज्या सामान्य नागरिकांनी या सिडको वसाहतीमध्ये घरे खरेदी केली. त्यांनाही सिडकोचे अधिकारी व कर्मचारी नाडून त्यांच्याकडून लाचेची रक्कम उकळत आहेत. सर्वसामान्यांच्या याच निकडीतून स्वताची संधी साधणारे लाचखोर सामान्यांना लुबाडत आहेत. सिडकोच्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिडको कार्यालयात लाचेचा मोठा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून सिडको प्रशासनातील कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाशी येथील सेक्टर ९ येथील नुर को-ऑप. हौ. सोसायटीमधील ५४ वर्षीय जागरूक नागरीकाने याबाबत माहिती अधिकारातून पहिल्यांदा या विभागाची माहिती समोर आणली. त्यानंतर या जागरूक नागरिकाने नवी मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर ही लाचखोरी रंगेहात पोलिसांनी पकडली. लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे नूर सोसायटीचे सचिव आहेत. काही सदस्यांनी राजीनामा दिल्याने नूर सोसायटीची कार्यकारी समिती मंडळ बरखास्त झाले होते. त्यानंतर सिडकोच्या सहकारी संस्था सह निबंधक यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली या गृहनिर्माण सोसायटीचा कारभार चालविला गेला. पुढे सोसायटीच्या कार्यकारीमंडळाच्या निवडणुकीनंतर पुन्हा सचिव म्हणून काम करत असताना विरोधकांनी उपनिबंधक कार्यालयात अर्ज करून संबंधित कमिटी रद्द करण्याची मागणी केली. याशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभा उशिरा घेतल्याचा आरोपही नोंदवण्यात आला.
७ ऑगस्टला या संबंधित अर्जावर प्रक्रिया थांबविण्याचा आदेश ( क्लोज ऑफ ऑर्डर) असा निकाल देण्यात आला.निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी सिडकोच्या सह निबंधक कार्यालयातील लोकसेवकांनी ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ती रक्कम ३ लाख ५० हजार इतकी ठरवण्यात आली. या मागणीच्या सत्यतेची पडताळणी करून १० सप्टेंबरला सिडकोच्या सह सह निबंधक कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी या कार्यालयात काम करणारे राहुल कांबळे, शिपाई महेश कामोठकर यांच्या मार्फत लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.लाच मागणी आणि स्वीकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७अ, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये राहुल रंगराव कांबळे (वय ५०), धनाजी दत्तात्रय काळुखे (वय ५२), खाजगी इसम किशोर शंकरराव मोरे, आणि शिपाई महेश गंगाराम कामोठकर यांचा समावेश असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक धर्मराज सोनके यांनी सांगीतले. गुरुवारी दुपारी या चारही संशयीत आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हे साडेतीन लाख रुपयांच्या रकमेत सिडकोचे अजून कोणते वरिष्ठ अधिकारी सामिल आहेत याची चौकशी पोलीस कऱणार आहेत.