Mumbai Engineer Locked Himself In House For Three Years: गेल्या सहा वर्षांत आई-वडिलांचा मृत्यू आणि त्यानंतर २० वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या भावाने केलेल्या आत्महत्येमुळे नवी मुंबईतील जुईनगर येथील ५५ वर्षीय व्यक्ती नैराश्यात गेला होता. त्यामुळे त्याने गेल्या तीन वर्षांपासून स्वत:ला घरात कोंडून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अनुप कुमार नायर असे या व्यक्तीचे नाव असून, तो केवळ ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठीच बाहेरील जगाशी संवाद साधायचा. या व्यक्तीने सेक्टर २४ मधील घरकुल सीएचएस येथील त्यांच्या घरात तीन वर्षांहून अधिक काळ स्वत:ला कोंडून घेतले होते. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
नायर यांच्या परिस्थितीबद्दल एका नागरिकाने सोशल अँड इव्हँजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह या स्वयंसेवी संस्थेला माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नायर यांच्या घरी धाव घेतली आणि नायर यांची विचारपूस केली.
पूर्वी कंप्युटर प्रोग्रामर म्हणून काम करणारे नायर मानवी विष्ठेने भरलेल्या आणि कचऱ्याचा ढीग साचलेल्या घरात एकटेच राहत होते. त्यांची आई, पूनम्मा नायर, भारतीय हवाई दलात (दूरसंचार शाखा) काम करत होत्या, तर वडील, व्ही. पी. कुट्टी कृष्णन नायर, मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचे.
गेल्या सहा वर्षांत दोन्ही पालकांचे निधन झाल्यामुळे आणि त्यांच्या मोठ्या भावाने २० वर्षांपूर्वी आत्महत्या केल्यामुळे अनुप कुमार नायर नैराश्यात गेले होते. त्यामुळे त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून स्वत:ला घरातच कोंडून घेतले होते, अशी माहिती सोशल अँड इव्हँजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह संस्थेचे पास्टर के. एम. फिलिप यांनी दिल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
नायर यांच्याबाबत अधिक माहिती देताना फिलिप म्हणाले की, “नायर फक्त लिविंग रूममध्ये ठेवलेल्या खुर्चीवर झोपायचे. हे पाहून आम्हाला धक्का बसला कारण त्याचे बहुतेक फर्निचर कोणीतरी घेऊन गेले आहे असे दिसते. त्याच्या पायालाही संसर्ग झाला असून, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्याच्या पालकांच्या मृत्यूनंतर त्याच्या काही नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु नायर कोणावरही विश्वास ठेवायचे नाही असे दिसते. त्यांना सध्या पनवेलमधील आमच्या सील आश्रमात ठेवण्यात आले आहे.”