नवी मुंबई – नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या परिदृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून २५ डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे. कारण याच दिवशी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआय) औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे. या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे.

पहिल्याच दिवशी प्रवाशांना आधुनिक टर्मिनल्स, सुटसुटीत प्रवासद्वारे, जलद प्रक्रियांमुळे सर्वोच्च दर्जाचा विमानप्रवास अनुभवता येणार आहे. नवी मुंबई, रायगड, ठाणे व कोकणातील लाखो प्रवाशांसाठी हे ‘घराजवळचे विमानतळ’ सिद्ध होणार आहे.

अकासा एअरची पहिली उड्डाणे

अकासा एअरने पहिल्या अधिकृत उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उद्घाटनाच्या दिवशी विशेष दिल्ली ते नवी मुंबई या पल्यावर (क्यूपी १८३१) या विमानाचे उड्डाण सकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी सुटून ८ वाजून १० मिनिटांना एनएमआय विमानतळावर हे विमान उतरेल. तसेच परतीचे उड्डाण क्यूपी १८३२ हे ८ वाजून ५० मिनिटांनी निघून सकाळी सव्वा अकरा वाजता दिल्लीला पोहोचेल.

२६ डिसेंबरपासून दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी नियमित उड्डाणे सुरू राहतील.

इंडिगो कंपनी सुद्धा विमानोड्डाणाच्या मैदानात – एनएमआय ते दिल्ली नॉन-स्टॉप उड्डाण

अकासा एअरनंतर इंडिगो कंपनीनेही नवी मुंबई विमानतळावरून आपले उड्डाण वेळापत्रक जाहीर केले आहे. ६ ई ५२६३ हे एक्सक्लुझिव्ह उड्डाण सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी एनएमआय विमानतळावरून सुटेल. तसेच हे विमान सव्वा अकरा वाजता दिल्ली येथील टी ३ या विमानतळावर पोहोचेल. उड्डाणाचा कालावधी १ तास ५० मिनिटे असून यासाठी आकारले जाणारे तिकीट दर ७,३२४ रुपयांपासून पुढे असणार आहेत. यासोबत ७१३ ब्ल्यूचिप्स (प्रवाशांना बक्षिस गुण) देणार असल्याचे इंडिगोने जाहीर केले आहे. हे उड्डाण सर्वात वेगवान असल्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.

पर्यटन, उद्योग आणि रोजगाराला नवा वेग

नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईवरील ताण कमी होणार असून उपशहरी व कोकणातील प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध होईल. या विमानतळामुळे व्यापार, उद्योग, रिअल इस्टेट, आतिथ्य व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राला नवा वेग मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

नवी मुंबईच्या विकासातील हा सुवर्ण अध्याय आता २५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उड्डाण घेणार असल्याने बांधकाम व्यवसायाला तेजी मिळेल असे बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.