नवी मुंबई— अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईला दूसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले. तसेच महामुंबईच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरणा-या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न साकार झाले. बुधवारी (ता. ८) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अत्याधुनिक विमानतळाचे अधिकृत उद्घाटन झाले. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांना घेऊन आलेले विशेष विमान जेव्हा विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले, तेव्हा वैमानिकाने केलेली ती अद्भुत घोषणा क्षणभरासाठी सर्वांच्या हृदयात रोमांच निर्माण करणारी ठरली.

“नवी मुंबई विमानतळावर आपले स्वागत आहे!” नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधानांना घेऊन आलेल्या विमानाचे आगमन झाल्यावर ही उद्घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र दि. बा. पाटील यांचे नाव अद्याप केंद्र सरकारने या विमानतळाला देण्याचे अधिकृत जाहीर न केल्याने ही उद्घोषणा देण्याचे विमानतळ ऑपरेटर कंपनीने टाळले असावे अशी चर्चा आहे. मात्र या विमानतळाच्या धावपट्टीवरून विमानं उडावीत आणि उतरावीत या प्रतिक्षेत अनेक वर्षे नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिक लक्ष्य देऊन होते. या विमानतळाच्या छायाचित्र लावून येथील विकासकांनी त्यांच्या सदनिका विक्री केल्या आहेत. यामुळे या विमानतळाचे उदघाटन झाले या गोड बातमीनेआनंद व्यक्त केला जात आहे. 

शेकडो नागरीक अनेक वर्षांपासून या विमानतळाच्या धावपट्टी वरून उड्डाण होताना किंवा उतरताना तो क्षण आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी उत्सुक होते. सिडको मंडळातील कार्यकारी अभियंता वैभव पाटील हे सुद्धा याच परिसरात राहणारे त्यांनी ही या क्षणाला सायंकाळी सूर्यास्तासोबत कैद केले आहे. 

बुधवार हा दिवस विमानतळ संचलनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. वैमानिकाने विमानातील प्रवाशांना उद्देशून केलेली ही घोषणा अशा पद्धतीची असल्याची माहिती लोकसत्ताला सिडकोच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.“महोदय आणि महोदया, मी या विमानाचा कॅप्टन बोलत आहेत. आम्ही आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. हवामान स्वच्छ आहे, आणि आम्ही या नव्याने उभारलेल्या जागतिक दर्जाच्या विमानतळावर काही मिनिटांतच लँड होणार आहोत. संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीने, आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो की आपण आमच्यासोबत प्रवास केला आणि या ऐतिहासिक क्षणाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या लँडिंगचे भाग बनलात. नवी मुंबईत आपले स्वागत आहे!”

वैमानिकाच्या या शब्दांनी प्रवाशांसह संपूर्ण देशाला नव्या पर्वाची जाणीव करून दिली.हा विमानतळ अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची सुविधा आणि पर्यावरणपूरक बांधणी या सर्व बाबींसाठी विशेष मानला जातो. मुंबईच्या वाहतूक ताणाला मोठ्या प्रमाणात आराम देणारे हे केंद्र ठरणार असून, देशाच्या आर्थिक राजधानीला नवी ओळख मिळवून देईल. उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे मान्यवर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा क्षण केवळ एक उद्घाटन नव्हे, तर भारताच्या प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घेण्याचा नवा अध्याय ठरल्याचे उदघाटनावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या भाषणा दरम्यान सांगितले.