नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येत्या काही महिन्यांत कार्यान्वित होण्याची चिन्हे असतानाच विमानतळाच्या दिशेने सुलभ वाहतूक करता यावी यासाठी राज्य सरकारकडून आखण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांपैकी विक्रोळी ते कोपरखैरणे या ठाणे खाडीवरील आणखी एका नव्या पुलाच्या कामालाही लवकरच मुहूर्त मिळेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्य सरकारने ठाणे ते नवी मुंबई विमानतळादरम्यान आखलेल्या बहुचर्चित उन्नत मार्गाची एक मार्गिका कोपरखैरणे-विक्रोळी जोडमार्गाशी जोडण्याचा निर्णय घेतल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावरून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बहुप्रतीक्षित जोडरस्त्याचे कामही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिकेने याच मार्गावर घणसोली ते ऐरोली दरम्यान पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले असून शीळ-महापे मार्गावरून पूर्व उपनगरांमध्ये ये-जा करण्याचा आणखी एक पर्याय यामुळे लवकरच उपलब्ध होऊ शकणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ अखेरपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. त्याद्वारे दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. तसेच हा प्रकल्प सन २०३८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याचे नियोजन आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे महत्त्व विचारात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन राज्य सरकारमार्फत हाती घेण्यात आले आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली यांसारख्या भागातून नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून ठाणे-विमानतळ उन्नत मार्गाची आखणी केली आहे. सुमारे २५.२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प सहा मार्गिकांचा असणार आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने ये-जा करण्यासाठी आखण्यात आलेल्या उन्नत मार्गाला सहा प्रमुख इंटरचेंज असतील अशा पद्धतीची आखणी सिडकोने केली आहे. त्यामध्ये कोपरी पटणी पूल, घणसोली ऐरोली खाडीपूल, वाशी येथील शीव-पनवेल महामार्ग, नवी मुंबईतील पाम बीच मार्ग आणि उलवे कोस्टल रोड या प्रमुख जोडरस्त्यांना हा उन्नत मार्ग जोडला जाणार आहे. या पाच जोडरस्त्यांच्या सोबत विक्रोळी-कोपरखैरणे हा दहा किलोमीटर अंतराचा नवा खाडीपूलही या नव्या उन्नत मार्गाला जोडला जाणार असून गेल्या दोन दशकांपासून चर्चेत असलेला या मार्गाला यानिमित्ताने वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सद्य:स्थितीत वाशी येथील दोन तर ऐरोली-मुलुंड खाडी पुलामार्गे मुंबई -नवी मुंबई असा प्रवास करणे सोयीचे ठरते. पुर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मुलुंड, कांजुरमार्ग, भांडुप या उपनगरांमधून नवी मुंबईत येजा करताना मोठ्या प्रमाणावर ऐरोली-मुलुंड खाडीपुलाचा वापर केला जातो. नवी मुंबईतून मुंबईतील पश्चिम उपनगरांच्या विशेषत: जोगेश्वरी ते कांदिवली या भागात ये-जा करण्यासाठी याच पुलाचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मुलुंड-ऐरोली खाडीपूल आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळीपासून कोपरखैरणेपर्यंत खाडीपुलाचा आणखी एक पर्याय असावा याविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यासंबंधीचा प्राथमिक अहवालही तयार केला आहे. दरम्यान, ठाणे-विमानतळ उन्नत मार्गाला महत्त्वाचा जोडरस्ता म्हणून विक्रोळी-कोपरखैरणे नवा खाडीपूल प्रस्तावित करण्यात आल्याने या कामाला वेग मिळेल, असा दावा मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. हा मार्ग पुढे महापे-शीळ तसेच ठाणे-बेलापूर मार्गासह जोडण्याचे नियोजन असल्यामुळे नवी मुंबई एमआयडीसी आणि शीळ-कल्याण रस्त्यावरून मुंबई उपनगरांच्या दिशेने जाण्यासाठीही हा खाडीपूल उपयोगी ठरेल, असे सूत्रांनी सांगितले.

खर्चाला मंजुरी

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग या प्रकल्पासाठी राज्य सरकारने सहा हजार ३६३ कोटी रुपयांच्या खर्चाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘बांधा, वापरा,हस्तांतरीत करा’ या तत्त्वावर टोल माॅडेलद्वारे केली जाणार आहे. वेगवेगळ्या जोडरस्त्यांद्वारे या मार्गावरुन विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागणार आहे.