नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळाने कंबर कसली आहे. शुक्रवारी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी करुन प्रत्येक कामाचा आढावा घेतला. पाच तासांहून अधिक काळ विमानतळ प्रकल्पाच्या कार्यालयात चाललेल्या या बैठकीमध्ये विमानतळ टर्मिनलचे काम अंतिम टप्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई व नवी मुंबईतील उपनगरांशी जोडणाऱ्या रस्ते बांधकामासह इतर कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई तसेच सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंघल यांनी सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या बैठकीमध्ये एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन आढावा घेण्यात आला. कोणतेही आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानतळ सुरू करण्यापूर्वी संबंधित विमानतळ प्राधिकरणाला विमानतळ सुरू करत असल्याची अधिसूचना या पब्लिकेशनमार्फत जाहीर करावी लागते. तसेच विमान वाहतूक नियामक संस्थेकडून विमानतळाला एरोड्रोम परवान्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्याबाबत आणि विमानतळातील धावपट्टी, टर्मिनल इमारतसारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा या बैठकीत आढावा घेतला. १७ एप्रिलला विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर मे महिन्यात विमानतळातून प्रत्यक्ष प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासाठीच्या सिडकोच्या हालचाली जोरदार सुरू आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मालवाहतूकीच्या अवजड वाहनांसह सामान्य प्रवाशांना सुद्धा सहज विमानतळापर्यंत विनासिग्नल आणि अडथळ्यांचे दळणवळण मिळावे यासाठी सिडको मार्फत विमानतळाच्या पश्चिम दिशेकडून मुंबईतून अवघ्या ३५ मिनिटांत एमटीएचएल पुलावरुन येणाऱ्या वाहनांना उलवे सागरी मार्गाने विमानतळापर्यंत येण्यासाठीचा मार्गाची सद्यस्थिती तसेच विमानतळ पूर्व दिशेला तीन वेगवेगळ्या उड्डाणपुलांचे काम सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इंटरचेंजींगचे काम सुरू आहे. त्यामुळे विमानतळ मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडले जाणार आहे. याच सर्व कामाचा शुक्रवारी सूक्ष्म आढावा व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला. ही सर्व कामे प्रगतीपथावर सुरू आहेत.

शांतनू गोयल, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai international airport terminal building work in final stage css