नवी मुंबई : शहरातील साहित्य, कला, संस्कृतीसाठी धडपडणाऱ्या जुन्या संस्थांनी वाशी सेक्टर ३ येथील महात्मा जोतिबा फुले स्मृतिभवनातील जागा नवी मुंबई महानगरपालिकेने कायमस्वरुपी भाडेतत्वावर द्यावी, अशी मागणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. या संस्थांनी स्मृतिभवनातील जागा तात्काळ रिकामी करण्याचे लेखी पत्र पालिकेने दिल्यानंतर या संस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

नवी मुंबई शहरात मागील अनेक वर्ष टाऊन लायब्ररी, नूतन महिला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, न्यू बॉम्बे म्युझिक अँड ड्रामा सर्कल, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, नवी मुंबई स्पोर्टस क्लब, अलर्ट इंडिया या संस्थानी वनमंत्री गणेश यांना लेखी निवेदन दिले आहे. १९७५ पासून असलेले सिडको समाज मंदिर वाशी सेक्टर ३ येथे कार्यरत आहेत. आजही या संस्था महात्मा फुले स्मृतिभवन प्लॉट नंबर १२, १३ सेक्टर येथे कार्यरत आहेत.

सिडकोने २००७ साली वाशी सेक्टर ३ येथील समाजमंदिर पालिकेला हस्तांतरित केले. त्यानंतर पालिकेने संस्था कार्यरत असलेल्या जागेचे नूतनीकरण केले. तेव्हा त्या ४ वर्षांच्या कालावधीत सर्व संस्थांना सेक्टर १ येथील नागरी आरोग्य केंद्रातील पहिल्या मजल्यावर भाडेतत्वावर जागा दिली होती. या ठिकाणी अपुऱ्या जागेतही या जुन्या संस्थांनी आपला कारभार नेटाने सुरू ठेवत वाचनालयासह कला, साहित्य,संस्कृती वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यानंतर पालिकेची नवी इमारत सज्ज झाल्यानंतर तत्कालिन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कार्यकाळात महात्मा फुले स्मृती भवन या वास्तूत जागा दिली. परंतु २८ जुलै रोजी नवी मुंबई महापालिकेने आम्हा सर्व संस्थांना जागा रिकामी करण्यास सांगितले आहे.

निविदा भरणे तसेच किंवा पर्यायी जागा उपलब्ध होणे शक्य नसल्याने जुन्या संस्थांना व प्रामाणिकपणे स्वत:हून भाडे देणाऱ्या संस्थांना पूर्वीप्रमाणेच भाडेतत्वावर जागा देण्यात यावी, तसेच निविदा अट काढून टाकण्यात यावी आणि पालिकेने या संस्थांशी भाडेकरार करावा अशी मागणी वनमंत्री नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.

गेली ५० वर्षापासून नवी मुंबईत कला, साहित्य, संस्कृतीची जपणूक करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना कायम स्वरुपात भाडेतत्वावर जागा देण्यात यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्रव्यवहार केला आहे. जुन्या संस्थांना या निविदा प्रक्रियेत न जाता पूर्वीप्रमाणेच भाडेतत्वावर जागा द्यावी ही मागणी केली आहे.वृषाली मगदूम ,अध्यक्ष नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था

राज्य शासनाच्या ‘महापालिका स्थावर मालमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण आणि भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरण’ नियमानुसार विद्यमान भाडेपट्ट्याचे पालिकेने शहरातील सामाजिक संस्थाना नूतनीकरण करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करून जुना भाडेकरार झालेल्या संस्थांना नूतनीकरण करून द्यायला हवे. जुन्या संस्थाना निविदा प्रक्रिया कशासाठी हवी? डॉ. प्रशांत थोरात, अध्यक्ष, प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई