नवी मुंबई : एकीकडे राज्यातली धरणे कोरडी पडू लागली असताना नवी मुंबईला महापालिकेच्या मोरबे धरणात मात्र यंदा गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक जलसाठा शिलकीत आहे. यात भर म्हणून मंगळवारी धरणक्षेत्रात ४१ मि.मी. पाऊस बरसला. धरणात ३९.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा पुढील ९३ दिवस म्हणजेच २१ ऑगस्टपर्यंत शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याएवढा आहे.
मोरबे धरण गेल्यावर्षी २८ ऑगस्ट २०२४ ला १०० टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. महामुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दिवसेंदिवस अतिशय सुनियोजित असलेल्या शहराचा दर्जा आणखी वाढत जाऊ लागला आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेच्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पालिकेने पाणी उपशावरही नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे. दुसरीकडे पालिकेने पोशीर व शिलार धरणाच्या माध्यमातून नवीन पाणीनियोजनही केले जात आहे.
नवी मुंबई शहरात झपाट्याने होणारी लोकसंख्यावाढ पाहता भविष्यासाठी नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात विविध जलस्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने नियोजनावर भर दिला होता. धरणातून दिवसाला ४५० दशलक्ष लीटर पेक्षा अधिक पाणी उपसा केला जात असून त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याची गरज व्यक्त होत आहे.
मोरबे धरणातील २१ मे २०२५ ची पाणीस्थिती…
वर्ष २०२२-२३ २०२३- २४ २०२४-२५
शिल्लक पाणीसाठा – ३२.८१ टक्के ३२.४१ टक्के ३९.२९ टक्के
धरण पातळी – ७१ .७५ मीटर ७१.६१ मीटर ७४.०१ मीटर
पुढील किती दिवस पुरेल एवढा जलसाठा- ९३ दिवस
कधीपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येणार – २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत
गेल्यावर्षी मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. पाणी उपशाबाबत योग्य काळजी घेण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्याप अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनपूर्व पाऊसही मोरबे परिसरात पडू लागला आहे. यंदाही धरण १०० टक्के भरावे अशी आशा आहे.-वसंत पडघन, कार्यकारी अभियंता, मोरबे प्रकल्प